निफ्टीही 300 अंकांनी वधारला, आयटी समभाग नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक सकारात्मक वातावरणामुळे भारतीय शेअर बाजार सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी मजबुत तेजीसह बंद झाला आहे. सेन्सेक्स निर्देशांक 1 हजार अंकांनी वधारलेला दिसला. आयटी क्षेत्रातील समभाग तेजीसह बंद झालेले दिसले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1041 अंकांच्या दमदार तेजीसमवेत 55,925.74 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 308 अंकांच्या तेजीसह 16661.40 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 4 कंपन्यांचे समभाग केवळ नुकसानीसह बंद झाले आहेत. आयटीसी, डॉ. रेड्डिज लॅब्ज, सनफार्मा व कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. टायटन, महिंद्रा आणि महिंद्रा तसेच इन्फोसिस यांचे समभाग दमदार तेजी दाखवत होते. विदेशी गुंतवणूकदारांनी मेमध्ये भारतीय शेअर बाजारातून 39 हजार कोटी रुपये काढले आहेत.
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार जोशात असलेला दिसला. सेन्सेक्स व निफ्टी हे दोन्ही निर्देशांक उत्साही मूड राखून होते. सेन्सेक्समध्ये इन्फोसिस, विप्रो, महिंद्रा, टायटन आणि अल्ट्रासिमेंट यांचे समभाग तेजीत होते. एथॉस लक्झरी आणि प्रीमीयम वॉच रिटेलर यांचा समभाग एनएसईवर 878 रुपये इशु प्राइसच्या तुलनेत 52 रुपये किंवा 6 टक्के सवलतीसह 825 रुपयांवर लिस्ट झाला आहे तर बीएसईवर 830 रुपयांवर लिस्ट झाला. निफ्टी आयटीसह सर्व निफ्टीतील निर्देशांक तेजीसह व्यवहार करत होते. निफ्टी बँक निर्देशांक 1.2 टक्के, ऑटो निर्देशांक 1.8 टक्के तर एफएमसीजी निर्देशांक 0.9 टक्के तेजीत होते. बाजारात आयआरसीटीसीचे समभाग मात्र फॉर्मात दिसले. कंपनीचे समभाग सुरूवातीच्या सत्रात बीएसईवर 9 टक्के वाढलेले दिसले. कंपनीचा समभाग सोमवारी बाजारात 712 रुपयांवर होता. दुसरीकडे महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे समभाग बाजारात 5 टक्के वाढलेले दिसले.