मुंबई
आगामी अंतरिम अर्थसंकल्प आणि अमेरिकेतील फेडरल बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजाराने सोमवारी दमदार उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. रिलायन्स इंडस्ट्रिजसोबत बँकिंग समभागांमध्ये खरेदीचा उत्साह बाजाराला 1200 अंकांनी तेजी मिळवून देऊ शकला.
सेन्सेक्स 1240 अंकांसह 71,941 अंकांवर तर निफ्टी 385 अंकांसह 21,737 अंकांवर बंद झाला. बाजारात लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य सोमवारी 6 लाख कोटी रुपयांनी वाढून 376 लाख कोटींवर पोहचले. सेन्सेक्समधील 7 समभाग 52 आठवड्यानंतर उच्चांकी भावावर पोहचले होते. विदेशी बाजारातही सोमवारी तेजी होती, ज्याचा परिणाम बाजारावर दिसला. निफ्टीत 38 कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले. रिलायन्सचा समभाग 7 टक्केवाढीसह 2905 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला.