सलग दुसऱया सत्रात सेन्सेक्स 632 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात तेजीचे वातावरण राहिल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक पातळीवरील बाजारांमधील सकारात्मक वातावरणासोबत दिवसभरात इन्फोसिस आणि बँक यांच्या समभागात लिलाव झाल्याने सेन्सेक्स 632 अंकांच्या मजबूतीसह बंद होण्यात यशस्वी झाला आहे.
शुक्रवारच्या सत्रात बीएसई सेन्मसेक्स आणि एनएसई निफ्टी वधारत बंद झाले असून यामध्ये दिवसअखेर सेन्सेक्स 632.13 अंकांनी वधारत 1.17 टक्क्यांवर मजबूत होत 54,884.66 वर निर्देशांक बंद झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 182.30 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 16,352.45 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांपैकी शुक्रवारी सेन्सेक्समधील टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, विप्रो, बजाज फायनान्स, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि एचसीएल टेक यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एनटीपीसी, भारती एअरटेल, पॉवरग्रिड कॉर्प, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेन्ट्स आणि नेस्ले यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
आशियातील अन्य बाजारात चीनच्या शांघाय कम्पोझिटसह दक्षिण कोरियाचा कोस्पी, हाँगकाँगचा हँगसेंग आणि जपानचा निक्की हे सकारात्मक कल प्राप्त करत बंद झाले. जागतिक बाजारांमध्ये तेजीसोबतच्या संकेतामुळे गुंतवणूकदारांनी खरेदी केली आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चे तेल 0.95 टक्क्यांनी वधारुन 118.5 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
या कामगिरीमुळे आगामी काळात भारतीय शेअर बाजार कोणते वळण घेणार याबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे. देशातील घटनांचाही प्रभाव बाजारावर राहणार असल्याचे शेअर बाजारातील तज्ञांनी यावेळी स्पष्ट केले आहे. सोमवारच्या कामगिरीवरच बाजाराची पुढची दिशा स्पष्ट होणार आहे.