रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधित तेजीत : निफ्टी 17,100 च्या वरती
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत. मागील आठवड्यामध्ये भारतीय बाजारातील सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांकांमध्ये पडझडीचा प्रवास राहिल्याचे दिसून आले होते, परंतु आता मात्र ही स्थिती राहिली नसून बाजारात सकारात्मक वातावरण आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 445.73 अंकांनी वधारुन निर्देशांक 58,074.68 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 119.10 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 17,107.50 वर बंद झाला आहे. प्रमुख क्षेत्रांपैकी बँक आणि कॅपिटल गुड्सचे समभाग हे जवळपास 1, 1 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच बीएसईमधील मिडकॅप व स्मॉलकॅपचे निर्देशांक 0.5 ते 0.5 टक्क्यांनी वधारल्याची नोंद केली आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सर्वाधिक म्हणजे 3.11 टक्क्यांची तेजी राहिली होती. यासोबतच बजाज फायनान्स, टायटन, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अॅण्ड टुब्रो, एचडीएफसी बँक व एचडीएफसीमधील समभाग वधारुन बंद झाले आहेत. यासह एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक, टाटा मोर्ट्स, टाटा स्टील आणि भारती एअरटेल यांचेही समभाग वधारत बंद झाले आहेत.
दुसरीकडे मात्र पॉवरग्रिड कॉर्प, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि सनफार्मा यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत.
रुपयात काहीशी घसरण
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 82.66 वर बंद झाला आहे. यासह मागील सत्रात रुपया हा 82.63 वर बंद झाला होता.
तज्ञांच्या नजरेतून
जागतिक पातळीवरील मुख्य घडामोडींपैकीच्या वातावरणामुळे बाजारात रिकव्हरी झाली आहे. त्याचा फायदा हा भारतीय बाजाराला झाला असल्याचे मंगळवारी दिसून आले आहे. यामध्ये युएस फेडरल रिझर्व्हचा व्याजदर निश्चित करणाऱ्या समितीच्या बैठकीवर आता जगभरातील विविध शेअर बाजारांच्या नजरा लागू राहिल्या आहेत. यामुळे या बैठकीतून जर का व्याजदर वाढ झाली किंवा न झाली तर त्यांचे परिणाम हे बाजारावर आगामी काळात पहावयास मिळणार असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.