तिहार तुरुंगात उपोषणामुळे बिघडली प्रकृती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीतील तिहार तुरुंगात उपोषण करत असलेला काश्मिरी फुटिरवादी नेता यासीन मलिकला प्रकृती बिघडल्याने आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलिकच्या रक्तदाबात चढ-उतार दिसून येत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
तर आपण उपचार करवून घेऊ इच्छित नसल्याचे मलिकने रुग्णालयातील डॉक्टरांना पत्राद्वारे कळविले आहे. प्रतिबंधित जम्मू-काश्मीर लिबरेशन प्रंटचा प्रमुख असलेल्या मलिकने शुक्रवारी सकाळी बेमुदत उपोषण सुरू केले होते. रुबैया सईदच्या अपहरण प्रकरणातील सुनावणीसाठी जम्मू येथील एका न्यायालयात हजर राहण्याची अनुमती केंद्र सरकारने नाकारली होती. यामुळे मलिकने उपोषण सुरू केले होते. या अपहरणप्रकरणी मलिक मुख्य आरोपी आहे.
रुबैया सईदच्या अपहरणप्रकरणी जम्मू येथील न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहू इच्छितो. 22 जुलैपर्यंत सरकारने यासंबंधी अनुमती न दिल्यास उपोषण करणार असल्याचे मलिकने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांसमोर हजर राहून म्हटले होते. मलिकला तिहारमधील अत्यंत सुरक्षित कोठडीत ठेवण्यात आले आहे. जेकेएलएफ प्रमुख मलिक दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.