वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी
वेस्टर्न अँड सदर्न ओपन टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या एम्मा रॅडुकानूने विजयी सुरुवात करताना अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का दिला. याशिवाय जपानच्या नाओमी ओसाकालाही पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसला.
19 वर्षीय रॅडुकानूने सेरेनावर पूर्ण वर्चस्व राखत 6-4, 6-0 असा विजय मिळविला. सेरेनाचा या मोसमातील केवळ चौथा सामना होता. 40 वर्षीय सेरेनाला लय मिळविण्यासाठी झगडावे लागत असल्याचे दिसून आले. रॅडुकानूचा हा या मोसमातील बारावा विजय होता. तिची पुढील लढत माजी अग्रमानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काशी होईल. अन्य एका सामन्यात चीनच्या झँग शुआईने 2020 मध्ये ही स्पर्धा जिंकणाऱया जपानच्या नाओमी ओसाकाचे आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आणले. शुआईने ओसाकावर 6-4, 7-5 अशी केवळ 75 मिनिटांत मात करीत दुसरी फेरी गाठली.
मेरी बुझकोव्हालाही दुसऱया फेरीत स्थान मिळाले. कोको गॉफविरुद्ध खेळताना गॉफ 5-3, 30-15 अशी आघाडीवर होती. पण डाव्या घोटय़ाला दुखापत झाल्याने तिने सामन्यातून माघार घेतली. बुझकोव्हाची दुसरी लढत अमेरिकेच्या ऍलिसन रिस्के अमृतराजशी होईल. अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सनेही दुसरी फेरी गाठताना आपल्याच देशाच्या सोफिया केनिनचा 6-2, 6-1 असा पराभव केला. द्वितीय मानांकित ऍनेट कोन्टावेट ही या स्पर्धेच्या शेवटच्या सोळा फेरीत पोहोचणारी पहिली खेळाडू बनली. तिने तेरेझा मार्टिनकोव्हाचा 3-6, 7-5, 6-4 असा पराभव केला. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता.