टॅन, हॅलेप, क्विटोव्हा, स्वायटेक, गॉफ, नदाल, सित्सिपस दुसऱया फेरीत, फेलिक्स, कोन्टावेट स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ लंडन
एक वर्षाच्या खंडानंतर पहिला सामना खेळणाऱया अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला विम्बल्डन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. रोमानियाची सिमोना हॅलेप, पॉला बॅडोसा, माजी विजेती पेत्र क्विटोव्हा, राफेल नदाल, स्टेफानोस सित्सिपस, किर्गीओस, इगा स्वायटेक, कोको गॉफ यांनी विजय मिळवित दुसरी फेरी गाठली तर फेलिक्स ऑगर ऍलियासिमे, ऍनेट कोन्टावेट यांचे आव्हान संपुष्टात आले.
महिला एकेरीत 23 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱया सेरेनाचा पुन्हा एकदा स्वप्नभंग झाला असून पहिल्या फेरीत तिला बिगरमानांकित हार्मनी टॅनकडून पराभव स्वीकारावा लागला. टॅनने हा सामना 7-5, 1-6, 7-6 (10-7) असा जिंकला. टॅनचा हा विम्बल्डनमधील पहिलाच सामना होता. तिसऱया सेटमध्ये तिने दोनदा मुसंडी मारत विजय साकार केला. ग्रँडस्लॅम स्पर्धेतील तिचा हा एकंदर तिसरा विजय आहे. तीन तास दहा मिनिटे हा सामना रंगला होता.
हॅलेप, क्विटोव्हाची विजयी सलामी
सिमोना हॅलेपने विम्बल्डन मोहिमेची सुरुवात विजयाने करताना झेकच्या कॅरोलिना मुचोव्हाचा 6-3, 6-2 असा पराभव केला. 65 मिनिटांत तिने हा सामना संपवला. चौथ्या मानांकित पॉला बॅडोसाने तासाभराच्या खेळात लुईसा चिरिकोचा 6-2, 6-1 असा फडशा पाडला. तिची पुढील लढत रोमानियाच्या इरिना बाराशी होईल. दोन वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या झेकच्या पेत्र क्विटोव्हाने एका सेटची पिछाडी भरून काढत सुमारे पावणेदोन तासात इटलीच्या जस्मिन पाओलिनीवर 2-6, 6-4, 6-2 अशी मात केली.
स्वायटेक, गॉफ विजयी
अन्य सामन्यात जागतिक अग्रमानांकित पोलंडच्या इगा स्वायटेकने क्रोएशियाच्या पात्रता फेरीतून आलेल्या याना फेटचा 6-0, 6-3 असा धुव्वा उडवित दुसरी फेरी गाठली. तिचा हा या मोसमातील सलग 36 वा विजय आहे. गेल्या वर्षी तिला चौथ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. अमेरिकेच्या 18 वर्षीय कोको गॉफनेही विजयी प्रारंभ करताना रोमानियाच्या इलेना गॅब्रिएला रुसेवर 2-6, 6-3, 7-5 अशी मात केली. गॉफ ही या स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू आहे. प्रेंच ओपन स्पर्धेत तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, त्यामुळे या स्पर्धेत ती जेतेपदापर्यंत पोहोचू शकेल, असे मानले जात आहे. दुसऱया मानांकित ब्रिटनच्या ऍनेट कोन्टावेटचे आव्हान मात्र दुसऱया फेरीत समाप्त झाले. तिला ज्युल नीमीयरने 6-4, 6-0 असे पराभूत केले.
नदालचा विजय, फेलिक्स पराभूत
पुरुष एकेरीत 2019 नंतर प्रथमच ग्रास कोर्टवर खेळणाऱया स्पेनच्या राफेल नदालने दुसरी फेरी गाठताना अर्जेन्टिनाच्या फ्रान्सिस्को सेरुन्डोलोचा चार सेट्समध्ये 6-4, 6-3, 3-6, 6-4 असा पराभव केला. साडेतीन तास ही लढत रंगली होती. नदाल 23 वे ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. या वर्षातील पहिल्या दोन ग्रँडस्लॅम त्याने जिंकल्या असून त्याची पुढील लढत रिकार्डस बेरान्किसशी होईल. लिथुआनियाच्या बेरान्किसने सॅम क्वेरीवर 6-4, 7-5, 6-3 अशी मात केली. जोमाने पुढे येत असलेल्या मॅक्झिम क्रेसीने विम्बल्डनच्या पदार्पणातच टॉप टेनमधील खेळाडूवर मात केली. त्याने सहाव्या मानांकित फेलिक्स ऑगर ऍलियासिमेचा संघर्षपूर्ण लढतीत 6-7 (5-7), 6-4, 7-6 (11-9), 7-6 (7-5) असा पराभव केला. दुसऱया फेरीत त्याची लढत जॅक सॉकविरुद्ध होईल. सॉकने बर्नाबे झपाटा मिरालेसचा 7-6 (8-6), 6-4, 6-4 असा पराभव केला. ग्रीसच्या चौथ्या मानांकित सित्सिपसला विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याने स्वित्झर्लंडच्या अलेक्झांडर रिशार्डवर 7-6 (7-1), 6-3, 5-7, 6-4 अशी मात करीत आगेकूच केली.