वृत्तसंस्था/ लंडन
येत्या सोमवारपासून येथे सुरू होणाऱया विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत अमेरिकेची माजी टॉप सीडेड आणि वयस्कर महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सची सलामीची लढत फ्रान्सच्या 24 वर्षीय हार्मनी टॅनशी होणार आहे. या स्पर्धेत सेरेनाला स्पर्धा आयोजकांनी वाईल्डकार्डद्वारे एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये प्रवेश दिला आहे.
40 वर्षीय सेरेनाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 23 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. सेरेनाने आपल्या टेनिस कारकीर्दीत डब्ल्यूटीए टूरवरील मानांकनात बराच कालावधी अग्रस्थान राखले होते. गेल्या वर्षभराच्या कालावधीत सेरेनाची टेनिस क्षेत्रात हालचाल मंदावली होती. सेरेनाने आतापर्यंत सातवेळा विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. 2022 विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सेरेनाचा सलामीचा सामना फ्रान्सच्या 113 व्या मानांकित हार्मनीशी होणार असून टॅनचे ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत पदार्पण होत आहे. सेरेनाने पहिल्या फेरीतील सामना जिंकल्यास तिची दुसऱया फेरीत गाठ 32 व्या मानांकित सारा टोर्मोशी पडेल. दुसऱया फेरीतील सामना जिंकल्यास तिला तिसऱया फेरीत सहाव्या मानांकित प्लिसकोव्हाची लढत द्यावी लागेल. गेल्यावर्षी विम्बल्डन स्पर्धेत प्लिसकोव्हाने उपविजेतेपद मिळविले होते तर ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने जेतेपद मिळविले होते. गेल्या मार्चमध्ये बार्टीने आपल्या वयाच्या 25 व्या वर्षी टेनिस क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याने ती यावेळी जेतेपद राखू शकणार नाही. पोलंडच्या टॉप सीडेड इगा स्वायटेकने अलिकडच्या कालावधीत सलग 35 सामने जिंकले असून त्यामध्ये प्रेंच ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचा समावेश आहे. 2019 साली रूमानियाच्या सिमोना हॅलेपने विम्बल्डन स्पर्धा जिंकताना अंतिम सामन्यात सेरेनाचा पराभव केला होता. 2020 ची विम्बल्डन स्पर्धा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली होती तर 2021 विम्बल्डन स्पर्धेत सेरेना दुखापतीमुळे सहभागी झाली नव्हती.