कुटुंबीयांना मिळवून दिली सरकारी नोकरी ः
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळच्या कन्नूरमधील शिक्षक भरती घोटाळय़ाचा मुद्दा आता तापू लागला आहे. या घोटाळय़ाप्रकरणी केरळमधील माकपच्या अनेक दिग्गज नेत्यांवर कुटुंबीयांना लाभ मिळवून दिल्याचा आरोप होत आहे. राज्यातील अनेक संस्थांमध्ये पार पडलेल्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे वैयक्तिक सचिव के.के. रागेश यांची पत्नी प्रिया वर्गीस यांची कन्नूर विद्यापीठातील मल्याळी विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून नियुकत करण्यात आली होती. वाद निर्माण झाल्यावर त्यांच्या नियुक्तीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी प्रिया वर्गीस यांच्या नियुक्तीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. याचदरम्यान राज्यात माकपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या पत्नींची अशाचप्रकारे नियुक्ती करण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. दोनवेळा खासदार राहिलेले पी.के. बाजू यांच्या पत्नीला केरळ विद्यापीठात तर राज्याचे उद्योगमंत्री पी. राजीव यांच्या पत्नीला कोची विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून नियुक्ती मिळाली आहे.
याचबरोबर केरळ विधानसभा अध्यक्ष एम.बी. राजेश यांच्या पत्नीला कलाडी येथील श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठात नियुक्ती मिळाली असल्याचे समोर आले आहे. माकपच्या या नियुक्ती घोटाळय़ाचा मुद्दा काँग्रेसने लावून धरला आहे. तर याप्रकरणी प्रिया वर्गीस आणि कन्नूर विद्यापीठ केरळ उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एखादा कर्मचारी संस्था प्रमुखाच्या विरोधात न्यायालयाकडे दाद मागू शकतो का या मुद्दय़ावर कायदातज्ञांचे मत जाणून घ्यावे लागणार असल्याचे राज्यपाल आरिफ खान यांनी म्हटले आहे. राज्यपाल खान हे कन्नूर विद्यापीठाचे कुलपती देखील आहेत.
राजभवनाचे अधिकार हे घटनेकडून निश्चित करण्यात आले आहेत. पुढील निर्देश केवळ राष्ट्रपतीच देणार असल्याने मी अधिक काही सांगू शकत नाही. प्रिया वर्गीस यांच्या नियुक्तीचा मुद्दा राजकीय असल्याने त्याला त्याचप्रकारे हाताळणार आहे. कुलपती म्हणून मी असताना विद्यापीठात कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा वशिलेबाजी तसेच घराणेशाही चालणार नसल्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले.