कोल्हापूर : चांदोली अभयारण्य़ालगत असणाऱ्या मानवी वस्तीमध्ये घुसून बिबट्याने आज एका मुलावर हल्ला केल्याचा घटना घडली आहे. या हल्ल्यात शाळकरी मुलगा गंभिर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे अभयारण्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली अभयारण्याला लागून असलेल्या उखळू इथल्या श्रेयस प्रकाश वडाम या नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला आहे. यामध्ये श्रेयस हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या घराशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ साडेसहाच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. उखळू गावालगतच्या डोंगराजवळ पाण्याची टाकी आहे. त्याच्या शेजारीच प्रकाश वडाम यांचे राहते घर आहे. या परिसरात बिबट्यासहित अन्य हिंस्र प्राण्यांचे नेहमीच वास्तव्य आढळून येते. आजपर्यंत बिबट्यांनी या परिसरातल्या अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले चढवून त्यांना ठार केले आहे. पण आत्ता प्रकाश वडाम यांच्या घराशेजारी झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रेयस वडाम या शाळकरी मुलावर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात त्याच्या डोक्यात, मानेवर, पाठीवर, कानावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला पुढील उपचारासाठी कराड मधील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे.


previous post
next post