होऊ शकला नाही विवाह, परंतु प्रेम कायम
खऱया प्रेमाच्या गोष्टी मोठय़ा प्रमाणात वाचल्या अन् ऐकल्या जातात. परंतु प्रत्यक्ष आयुष्यात असे प्रेम पहायला मिळण्याची संधी क्वचितच मिळते. लोक प्रेमाच्या नावावर जीव घेण्यास तयार असतात, परंतु ते निभावणारे फारच कमी भेटतात. सद्यकाळात सोशल मीडियावर प्रेंमाची एक अशी कहाणी व्हायरल होत आहे, जी ऐकून तुमचेही डोळे पाणावतील.
एक जोडप्याची भेट झाली तेव्हा त्यांचे विवाहाचे वय झाले होते. परंतु नियतीला काही दुसरेच मान्य होते. या दोघांचा विवाह झाला नसला तरीही त्यांनी प्रेमाचे नाते निभावण्याचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. 1992 मध्ये तेव्हा 29 वर्षांचे असणारे शू झिली हे 21 वर्षीय हुआंग कुइयुन हिला भेटले होते. हुआंग ही स्थलांतरित कामगार होती. त्या काळात सुरू झालेली ही प्रेमकहाणी आज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.


कहाणी अधुरी, पण प्रेम पूर्ण
मध्य चीनच्या हुनान प्रांतात हुई शु आणि हुआंग यांनी भेटीच्या एक महिन्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नियतीला हे मान्य नव्हते. हुआंग ही शु याची स्वतःच्या कुटुंबीयांसोबत भेट घडवून आणण्यासाठी बसने प्रवास करत होती. या बसचा अपघात होत ती 70 मीटर खोल दरीत कोसळली होती. हुआंग या दुर्घटनेनंतर पॅरालाइज्ड झाली, तर शू किरकोळ जखमी झाला होता. ही त्यांच्या प्रेमाची परीक्षा होती कारण लोकांनी हुई याला हुआंगची साथ सोडण्याचा सल्ला दिला. परंतु हुईने असे करण्यास नकार दिला.
आजही पाळत आहेत वचन
हुआंगला जीवनभर काळजी घेण्याचे वचन दिले होते आणि अनेक संकटानंतरही माझे वचन मी मोडलेले नाही असे शू यांचे सांगणे आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज झालयावर हुआंगला शू यांनी स्वतःच्या घरी आणले अणि तेव्हापासून ते तिची देखभाल करत आहेत. शू यांनी गावात राहून शेती करत घर चालविले. प्रेयसीच्या मनोरंजनासाठी ते चिनी वाद्य इरहू वाजविणे शिकले. हुआंगच्या कुटुंबीयांना या घडलेल्या प्रकाराची कल्पना नव्हती. तरीही तिचे वडिल या जोडप्यापर्यंत पोहोचले आणि आता दोघांनीही विवाहासाठी अर्ज केला आहे.