प्रतिनिधी / फोंडा
राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाचा भाग म्हणून फोंडा येथील जूना बाजार सरकारी हायस्कूलमध्ये ‘पर्यटन व प्रसार माध्यमे’ या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. दै. तरुण भारतचे फोंडा प्रतिनिधी सदानंद सतरकर यांनी या सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पर्यटन कौशल्य उपक्रमाच्या प्रशिक्षिका जुई कोटीभास्कर व स्वेताशा नाईक या उपस्थित होत्या.
सदानंद सतरकर यांनी ‘पर्यटन व प्रसारमाध्यमे’ या क्षेत्राविषयी प्राथमिक माहिती दिली. दोन्ही क्षेत्रांचा आवाका, विविध शाखा, अभ्यासक्रम व भवितव्याच्या संधीविषयी माहिती दिली. चोखंदळ पर्यटन व त्याबाबत दृष्टीकोन कसा असावा व त्यातील बारकावे सांगितले. शिक्षण मंत्रालया अंतर्गत गोवा समग्र शिक्षा अभियान व शिक्षण खात्यामार्फत जूना बाझार हायस्कूलमध्ये पर्यटन कौशल्य मार्गदर्शन उपक्रम सुरु आहे. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्राविषयी माहिती, प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी, तसेच पर्यटनाला पुरक कौशल्ये शिकवली जातात. हॉटेल व्यवसाय, रेस्टोरंट व त्यात लागणारी विविध कौशल्ये याविषयी त्या त्या क्षेत्रातील तज्ञामार्फत मार्गदर्शन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटन व प्रसार माध्यमे या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांना चॉकलेट्स बनविणे, बेकिंग, व्हेजिटेबल कार्व्हींग आदींचे प्रशिक्षण तसेच कोरोना काळात पर्यटन उद्योग व हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ञांचे वेबिनार आयोजित करण्यात आले आहेत. या शिवाय काही पर्यटन स्थळांवर अभ्यास दौरे, तारांकीत हॉटेल्समध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव हे सुट्टीच्या काळात 80 तासांचे जॉब ट्रेनिंगही देण्यात आले आहे.