कम्युनिस्ट पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : उद्योजक गौतम अदानी यांनी शेअर मार्केटमध्ये जे पैसे गुंतविले आहेत, त्या पैशांबाबत अमेरिकास्थित कंपनी हिडेनबर्ग हिने अहवाल तयार करून प्रसिद्ध केला. त्यामध्ये मोठा गैरप्रकार झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर चकार शब्दही काढला नाही. वास्तविक लोकसभेमध्ये त्यावर चर्चा होणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी ते टाळले आहे. त्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी, या मागणीसाठी कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. विरोधी पक्षाने लोकसभेमध्ये जोरदार आवाज उठविला. अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्या मैत्रीबाबत संपूर्ण जगाला माहिती झाली आहे. शेअर मार्केटमध्ये कशाप्रकारे पैसे अदानी गुंतवत होते, त्याचे गेल्या दोन वर्षांपासून हिंडेनबर्ग या कंपनीने संशोधन केले आहे. त्यानंतरच त्यांनी हा अहवाल संपूर्ण जगासमोर आणला आहे. इतका मोठा गैरप्रकार झाला असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर चर्चा करण्यास टाळतात, ही खरोखरच गंभीर घटना आहे.
विरोधी पक्षांनी संसदेमध्ये चर्चा करावी, अशी मागणी केली. वास्तविक याबाबत पंतप्रधान तसेच अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे होते. भ्रष्टाचारमुक्त भारत करणार म्हणत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारालाच पाठीशी घालत आहेत, असा आरोपदेखील कम्युनिस्ट पक्षाने केला. या प्रकारामुळे संपूर्ण जगासमोर देशाची प्रतिमा मलिन झाली आहे. तेव्हा तातडीने संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी, अशी मागणी केली आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार आवाज उठविला. राहुल गांधी यांनी याबाबत सरकारला जाब विचारला. त्यानंतर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. खरोखरच लोकशाही संकटात आली आहे. सरकारने भ्रष्टाचार केल्यानंतर त्याबाबत हुकूमशाही करायची, हा कोणता न्याय? तेव्हा आता जनतेतूनच याबाबत उठाव होणे गरजेचे आहे. त्यासाठीच आम्ही आता हे आंदोलन करत असून तातडीने समिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकारामुळे एलआयसी त्याचबरोबर इतर कंपन्यादेखील अडचणीत आल्या आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आयटकचे अध्यक्ष अॅड. नागेश सातेरी, कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. अनिल आजगावकर, अर्जुन सांगावकर, उमा माने, कलावती कार्लेकर, दीपिका जाधव, गायत्री गोणबरे, सातेरी जाधव, कृष्णा शहापूरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.