नगरसेवक शंकर पाटील यांच्याकडून महापौरांना निवेदन
बेळगाव : शहर आणि उपनगरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून प्रत्येक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी होत आहेत. वॉर्ड क्र. 7 मध्ये अनेक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून नागरिकांना भीतीच्या छायेखाली रहावे लागत आहे. त्यामुळे तुरमुरी डेपो परिसरात एक एकर जागेत कुत्र्यांसाठी निवारा शेल्टर बनवावे, असे निवेदन नगरसेवक शंकर पाटील यांनी महापौरांकडे सादर केले आहे. तुरमुरी कचरा डेपो परिसरात 65 एकर जागा असून यापैकी एक एकर जागेचा विनियोग करून भटक्या कुत्र्यांसाठी निवारा शेल्टर उभारण्यात यावे. तसेच शहरातील सर्व कुत्र्यांना पकडून त्या ठिकाणी ठेवण्यात यावे. महापालिका व्याप्तीमध्ये असंख्य हॉटेल्स असून या हॉटेलमधील कचरा कुत्र्यांसाठी खाद्यपदार्थ म्हणून देता येऊ शकतो. तर कुत्र्यांच्या बंदोबस्ताबरोबर हॉटेल कचऱ्याचे निवारणदेखील करणे सोयीचे होईल. त्यामुळे हा प्रस्ताव राबविण्यासाठी महापालिकेने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन महापौर शोभा सोमनाचे यांना सादर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा व हा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे.