पुणे / वार्ताहर :
Seven accused arrested in serum fraud case ‘सीरम’चे मालक अदर पूनावाला यांच्या नावे मेसेज पाठवून कंपनीची एक कोटांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चार राज्यातून सात आरोपींना अटक केली आहे. मात्र, यामागील सूत्रधार अद्यापही फरार आहे. यात सात जणांची बॅंक खाती व्यवहारासाठी वापरण्यात आली होती. त्यांच्याकडील आठ खात्यांत आलेले पैसे इतर 40 बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
राजीव कुमार शिवाजी प्रसाद(रा. बिहार), चंद्रभुषण आनंद सिंग (रा. बिहार), कन्हैयाकुमार संभु महंतो (बिहार), रविंद्रकुमार हुबनाथ पटेल (उत्तरप्रदेश), राबी कौशलप्रसाद गुप्ता (मध्यप्रदेश), यासीर नाझीम खान(27, रा. मध्यप्रदेश) आणि प्रसाद सत्यनारायण लोबुडू (रा. आंध्रप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
अधिक वाचा : उद्यापासून ‘या’ 11 मार्गांवरील PMPML ची सेवा बंद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरमचे संचालक सतिश देशपांडे यांच्या मोबाईलवर मुख्य आरोपीने मेसेज करुन तो सीईओ अदर पूनावाला असल्याचे भासवले होते. मेसेजमध्ये मी मिटींगमध्ये व्यस्त आहे, मला फोन करु नका, मी पाठवलेल्या एकूण आठ बॅंक खात्यावर तात्काळ रक्कम पाठवा, असे लिहले होते. देशपांडे यांनी तात्काळ संबंधीत बॅंक खात्यावर 1 कोटी 1 लाख रुपये पाठवले. दोन दिवसांनी त्यांचे अदर पूनावाला यांच्याशी फोनवर बोलणे झाले, तेव्हा त्यांनी अशा प्रकारे कोणताच मेसेज केला नसल्याचे सांगितले. त्यानंतर सीरमच्या फायनांन्स मॅनेजरने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करुन सिरम कंपनीचे पैसे वर्ग झालेल्या बॅंक खात्यांची माहिती काढली. ही खाती असलेल्या बिहार, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि उत्तरप्रदेशातील सातही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मुख्य आरोपीला त्यांची बॅंक खाती कमिशनच्या बदल्यात वापरण्यास दिल्याचे निष्पन्न झाले. मुख्य आरोपीने त्यांच्या आठ बॅंक खात्यातील पैसे इतर चाळीस बॅंक खात्यात वर्ग केले आहेत. यातील प्रसाद लोबुडू हा संगणक अभियंता आहे, तर राबी गुप्ता हा विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. दोघेही एका बडय़ा खासगी बॅंकेत कामाला आहेत, तर यासीन खानचे शिक्षण बीटेक पर्यंत झाले आहे.