Tarun Bharat

बस दरीत कोसळून सात जवान हुतात्मा

Advertisements

39 जवानांना घेऊन जाणाऱया बसला दुर्घटना ः ‘आयटीबीपी’च्या बसला अपघात

श्रीनगर / वृत्तसंस्था

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आयटीबीपीच्या जवानांना घेऊन जाणाऱया बसला मंगळवारी मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत सात जवान हुतात्मा झाले आहेत. चंदनवाडीवरून पहलगामला 39 जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याने  भीषण अपघात झाला आहे. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते. अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जवान परतत होते. त्याचदरम्यान हा अपघात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

अपघात झालेल्या बसमध्ये 39 जवान होते. ज्यामध्ये आयटीबीपीचे 37 जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन जवानांचा समावेश होता. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली, अशी माहिती मिळत आहे. बस दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला चार जवानांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर एकूण सात जण हुतात्मा झाल्याचे जाहीर करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आयटीबीपी मुख्यालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

हुतात्मा जवानांची नावे जाहीर

अपघातात सात जवान हुतात्मा झाले असून 30 जवान जखमी झाले आहेत. मदतकार्यासाठी घटनास्थळी 19 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. हेडकॉन्स्टेबल दुला सिंग (तरनतारन, पंजाब), कॉन्स्टेबल अभिराज (लखीसराय, बिहार), कॉन्स्टेबल अमित कुमार (एटा, उत्तर प्रदेश), कॉन्स्टेबल डी. राज शेखर (कडप्पा, आंध्रप्रदेश), कॉन्स्टेबल सुभाष बैरवाल (सीकर, राजस्थान), कॉन्स्टेबल दिनेश बोहरा (पिथौरागढ, उत्तराखंड) आणि कॉन्स्टेबल संदीप कुमार (जम्मू विभाग) अशी हुतात्मा जवानांची नावे आहेत.

गंभीर जखमी जवानांवर श्रीनगरमध्ये उपचार

या दुर्घटनेत सात जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. आठ गंभीर जखमी जवानांना उपचारासाठी श्रीनगरला नेण्यात आले आहे. उर्वरितांवर अनंतनाग येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे आयटीबीपीचे डीजी एस. एल. थोसेन यांनी सांगितले. तसेच जम्मू-काश्मीरचे डीआयजी रणबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमी जवानांना श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. उर्वरित जवानांची प्रकृती स्थिर आहे.

हजारो भाविकांचे ‘देवदूत’, स्वतः मात्र असुरक्षित!

स्वतःचा जीव धोक्यात घालून केदारनाथ आणि अमरनाथमध्ये ‘देवदूत’ बनून हजारो लोकांचे प्राण वाचवणारे आयटीबीपीचे जवान स्वतः मात्र सुखरूप परत येऊ शकले नाहीत, अशी प्रतिक्रिया काश्मीरमधील भीषण दुर्घटनेनंतर व्यक्त केली जात आहे. बर्फाळ पर्वतांमधून जाणाऱया भारत-चीन सीमेवरील दक्षतेचा उल्लेख केला तर आयटीबीपीचे नाव सहज समोर येते. हे जवान प्रतिकूल परिस्थितीतही या दुर्गम सीमेचे रक्षण करतात. याच आयटीबीपी जवानांनी अमरनाथमधील यात्रेदरम्यानही हजारो भाविकांना सर्वतोपरी मदत केली. पवित्र अमरनाथ यात्रेदरम्यान आयटीबीपीसह आणि इतर दलाच्या जवानांनी प्रशंसनीय काम केले. 8 जुलै रोजी अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात पाणी तुंबले होते. तंबू वाहून गेल्यानंतर राबविलेल्या बचावकार्यात आयटीबीपीचे जवानही आघाडीवर होते. त्यांनी सलग 36 तास काम केले होते.

Related Stories

अँटीबॉडी कॉकटेल औषध भारतात उपलब्ध

Patil_p

पंजाबच्या प्रसिद्ध गीतकाराची आत्महत्या

Patil_p

लष्कराचा ‘तो’ जवान 18 दिवसांपासून बेपत्ता

datta jadhav

पालघर : घराला लागेल्या आगीत एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

मंगळूर विमानतळावर बॉम्बमुळे खळबळ

sachin_m

राज्यात वीज, पाणी, दूध दरवाढ नाही

Patil_p
error: Content is protected !!