परिसरात दुर्गंधी पसरल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात : तातडीने समस्या सोडविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
डेनेज वाहिन्या तुंबण्याचे प्रकार सातत्याने सुरू असून शनिवारी राष्ट्रीय महामार्गाशेजारील गांधीनगर परिसरात सर्व्हिस रस्त्यावर सांडपाण्याचे तळे साचले होते. डेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने दोन फूट पाणी साचल्याने संपूर्ण रस्ता सांडपाण्याच्या विळख्यात सापडला होता. परिसरात दुर्गंधी पसरल्याने रहिवाशांसह नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला.
राष्ट्रीय महामार्गाशेजारील सर्व्हिस रस्त्यालगत असलेले डेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने सर्व्हिस रस्त्यावर पाणीच पाणी साचले. संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहनधारकांना ये-जा करताना कसरत करावी लागले. सर्व्हिस रस्त्यावर दीड फूट सांडपाणी आल्याने चारचाकी आणि दुचाकी वाहनधारकांना ये-जा करताना अडचणी निर्माण झाल्या. मात्र या पाण्यामधून अवजड वाहनांची ये-जा सुरू होती. सांडपाण्याचे तळे निर्माण झाल्याने दुर्गंधी पसरली होती. जवळच काही हॉटेल, गॅरेज व बसथांबा असल्याने याठिकाणी येणाऱया नागरिकांना दुर्गंधीचा आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागला. अन्य पर्यायी रस्ता नसल्याने दुचाकी वाहनधारकांनादेखील दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामधूनच मार्ग काढण्याची वेळ आली. याबाबत मनपाकडे तक्रार करण्यात आली होती. पण दुरुस्ती करण्यात आली नसल्याने सर्व्हिस रस्त्यावर दिवसभर सांडपाणी साचून होते. याचा फटका नागरिकांना सोसावा लागला. डेनेज वाहिन्या तुंबण्याचे प्रकार घडत असल्यानेच अशा अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे डेनेज वाहिन्यांची दुरुस्ती वेळेवर करून स्वच्छता राखावी, अशी मागणी होत आहे.