कॅन्टोन्मेंटला 37 लाखांचे अनुदान यापुढे सतत मिळणार
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट हद्दीतील पथदिपांचा वीजपुरवठा बंद केल्यानंतर दीड महिना सर्व रस्त्यांवर अंधार पसरला होता. त्या दरम्यान राज्य शासनाकडे पाठपुरावा करून एसएफसी निधी मंजूर करण्याची विनंती केली होती. अखेर या प्रयत्नांना यश लाभले असून पथदिपांच्या बिलापोटी कॅन्टोन्मेंटला 37 लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. ही बिलाची रक्कम यापुढे सातत्याने मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डला केंद्र व राज्य शासनाकडून निधी दिला जात होता. मात्र 2011 पासून राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला नाही. तसेच केंद्र शासनानेदेखील चार वर्षांपासून निधी दिला नव्हता. परिणामी कॅन्टोन्मेंटची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. विद्युत बिल, पाणीपट्टी आणि कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठीदेखील कॅन्टोन्मेंटकडे निधी उपलब्ध नाही. अशातच कॅन्टोन्मेंट परिसरातील पथदिपांच्या विद्युत बिलाची रक्कम हेस्कॉमला अदा करण्यात आली नाही. त्यामुळे हेस्कॉमच्या विद्युत बिलाची रक्कम 2 कोटींहून अधिक झाली होती. सदर रक्कम भरण्यासाठी हेस्कॉमने कॅन्टोन्मेंटकडे तगादा लावला होता. पण बिलाची रक्कम अदा केली नसल्याने अखेर हेस्कॉमने कॅन्टोन्मेंट परिसरातील विद्युतपुरवठा खंडित केला होता.
एसएफसी अनुदानाच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंटला देण्यात येणाऱया निधीची रक्कम विद्युत बिल भरण्यासाठी वापरण्यात येत होती. पण 2011 पासून एसएफसी अनुदानाची रक्कम राज्यशासनाने दिली नसल्याने बिलाची रक्कम थकली होती. त्यामुळे कॅन्टोन्मेंटचा विद्युतपुरवठा हेस्कॉमने तोडला होता. यादरम्यान एसएफसी अनुदान मंजूर करून घेण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बँक खाते व आवश्यक माहिती देण्याची सूचना राज्यशासनाने केली होती. अखेर कॅन्टोन्मेंटच्या पाठपुराव्याला यश आले.
मात्र अडीच कोटींहून अधिक विद्युत बिलाची रक्कम थकली आहे. सदर रक्कम कॅन्टोन्मेंट भरणार की, राज्यशासन मंजूर करणार याबाबतचे चित्र स्पष्ट झाले नाही. ही रक्कम शासनाने एसएफसी अनुदानांतर्गत द्यावी, अशी कॅन्टोन्मेंटची अपेक्षा आहे.
कॅन्टोन्मेंटकडे निधी नसल्याने कमगारांचे वेतन देणे कठीण बनले आहे. अशातच पाणीपट्टीची रक्कमदेखील अडीच कोटींहून अधिक थकली आहे. त्यामुळे थकलेली पाणीपट्टी आणि विद्युत बिलाची रक्कम कॅन्टोन्मेंट बोर्ड कशी भरणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.