शाहूवाडी/प्रतिनिधी
चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी येळाणे ता. शाहूवाडी येथे आलेल्या तिघा चोरट्यांना सापळा रचून पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. यावेळी चोरट्यांकडून सुमारे साडेसात लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. त्यामुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास यश आले.
याप्रकरणी समर्थ मच्छिंद्र भोपळे (वय २२), राकेश सदाशिव पाटील (वय २३), स्वप्निल शिवाजी भोपळे (वय २६), सर्वजण रा. मलकापूर, सणगर गल्ली ता. शाहूवाडी अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अमंलदार शिवाजी जामदार यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार समर्थ भोपळे, राकेश पाटील व स्वप्निल भोपळे हे तिघेजण त्यांच्याकडे असणारे चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी ते कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील येळाणे, ता. शाहुवाडी गावातील मोरया किराणा मालाच्या दुकानासमोर येणार आहेत, अशी माहिती मिळाली.
पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार शिवाजी जामदार, किरण शिंदे व विनोद कांबळे यांच्या पथकाने किराणा दुकानाजवळ सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांच्या जवळील १५५ ग्रॅम वजनाचे सुमारे साडे सात लाखांचे दागिन्यासह चोरट्यांना जेरबंद केले. यामुळे शाहुवाडी पोलीस ठाण्याकडील दाखल घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास त्यांना यश आले. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांचा मित्र अमर निवास खामकर यांने तीन वर्षांपूर्वी मलकापूर येथील संजीवनी सणगर यांच्या घरी केलेल्या चोरीतील दागिने विक्रीसाठी आणले असल्याचे सांगितले ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोरले, उपनिरीक्षक शेष मोरे अहमदनगर शिवाजी जामदार आदींनी केली .