वृत्तसंस्था/ढाका
बांगलादेशचा अनुभवी आणि ज्येष्ठ अष्टपैलू शकीब अल हसनची आगामी होणाऱया आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी तसेच आयसीसीच्या आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि न्यूझीलंडविरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी बांगलादेश संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी बांगलादेश क्रिकेट मंडळाने ही घोषणा केली.
आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये भरविली जाणार आहे. तसेच येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱया आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी बांगलादेश क्रिकेट मंडळाने 17 जणांचा संघ जाहीर केला आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आपल्या संघात बरेच महत्त्वाचे बदल केले आहेत. दुखापतीमुळे लिटॉन दास या स्पर्धेत खेळू शकणार नाही. मध्यफळीतील फलंदाज शबीर रेहमानचे संघात पुनरागमन झाले आहे. मुस्ताफिजुर रहीमलाही संघात स्थान देण्यात आले आहे. एस. इस्लाम, मुनीम शहरीयार आणि नजमुल हुसेन यांना संघातून वगळण्यात आले आहे. इबादोत हुसेन तसेच नुरुल हसन यांचाही या स्पर्धेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
बांगलादेश संघ- शकीब अल हसन (कर्णधार), अनामुल हक, मुशफिकर रहीम, अतिफ हुसेन, मोसादेक हुसेन, मेहमुदुल्ला, मेहदी हसन, मोहमद सैफुद्दीन, हसन मेहमूद, मुस्ताफिजुर रेहमान, नेसूम अहमद, शबीर रेहमान, मेहदी हसन मिराज, इबादोत हुसेन, परवेझ हुसेन, नुरुल हसन आणि तश्कीन अहमद.