शेवटचा श्रावण सोमवार भक्तिमय वातावरणात : दर्शनासाठी भक्तांची गर्दी : अभिषेक, भजन, प्रवचन, कीर्तन, महाप्रसादाचे कार्यक्रम : मंदिरे भक्तांनी फुलली : विशेष पूजा-अर्चांचे आयोजन
वार्ताहर /किणये
बेळगाव तालुक्यात शेवटचा श्रावण सोमवार मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावागावांतील शिवमंदिरांमध्ये सोमवारी दिवसभर हर हर शंभो, शंभो महादेवाचा गजर झाला. मंदिरांमध्ये अभिषेक, पट्टाभिषेक, भजन, प्रवचन, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. तालुक्याच्या अनेक गावांमध्ये सिद्धेश्वर, कल्मेश्वर, रामेश्वर, ब्रह्मलिंग आदी शिवस्वरुप मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये श्रावणमासानिमित्त महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार दि. 22 रोजी चौथा व शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त विशेष पूजा-अर्चा करण्यात आली. भक्तांनी मंदिरे फुलून गेली होती.
सोमवारी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली होती. मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. फुले, हारांनी मंदिरे सजविण्यात आली होती. यावेळी रात्रीच्या वेळीही मंदिरे आकर्षक दिसून येत होती. बहुतांशी शिवस्वरुप पिंडी असलेली ही देवस्थाने त्या-त्या गावांची ग्रामदैवते आहेत. त्यामुळे भाविकांची या देवस्थानांवर अधिक श्रद्धा आहे. बऱयाच गावांमध्ये श्रावणातील सोमवार, मंगळवार, शुक्रवार असे काही ठराविक वार पाळणूक करण्यात आली होती.
राजहंसगड येथील जागृत सिद्धेश्वर मंदिरात सोमवारी भक्तांची मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून आली. मंदिरात सकाळी अभिषेक व विधिवत पूजा-अर्चा कार्यक्रम झाला. त्यानंतर दिवसभर भाविक दर्शनाचा लाभ घेताना दिसत होते. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. राजहंसगड, सुळगे, येळ्ळूर, देसूर, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, वडगाव, शहापूर आदी भागातील भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. बाळगमट्टी येथील संतिबस्तवाड क्रॉसनजीक निसर्गरम्य परिसरात असलेल्या ब्रह्मलिंग मंदिरात चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ब्रह्मलिंगाची विशेष पूजा करण्यात आली. येथे या भागातील भक्तांनी गर्दी केली होती. दुपारी तीननंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
मच्छे, बेनकनहळ्ळी येथील ब्रह्मलिंग मंदिरात, बिजगर्णी गावातील ब्रह्मलिंग मंदिरात विशेष पूजा व अभिषेक कार्यक्रम झाले. रणकुंडये येथील कल्मेश्वर मंदिरातही भक्तांनी दर्शन घेतले.
पिरनवाडी येथील सिद्धेश्वर मंदिर, खादरवाडी येथील ब्रह्मलिंग मंदिरात अभिषेक, भजन आदी कार्यक्रम झाले. राकसकोप येथील शिवमंदिरातही दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती.
बहाद्दरवाडी येथील ब्रह्मलिंग मंदिरात पुरोहितांच्या उपस्थितीत ब्रह्मलिंग पिंडीला अभिषेक करण्यात आला. दुपारी 4 नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
बेळगुंदी येथील रवळनाथ मंदिरात शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते. गावातील सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते. नावगे येथील रामलिंग मंदिरात सोमवारी सकाळी गावचे इनामदार जयसिंग देसाई यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी गावातील बालचमू मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
धामणे बसवाण्णा मंदिर
धामणे : येथे श्रावण मासानिमित्त परव कमिटीच्यावतीने येथील जागृत देवस्थान श्री बसवाण्णा मंदिरात सोमवार दि. 22 रोजी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पहाटे 5 वाजता देवाला विधिवत अभिषेक घालण्यात आला. सकाळी 7 वाजता पूजन आणि आरती झाली. त्यानंतर दुपारी 2 वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. धामणे, ब्रह्मलिंगहट्टी, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी व पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कणबर्गी सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी : महाप्रसाद कार्यक्रम
सांबरा ः हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिरात सोमवारी शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान, दिवसभरात हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतला.
प्रारंभी सकाळी मंदिरात पूजा व इतर धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. अकरा वाजता महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला. रहदारी सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. दुपारी दोननंतर भाविकांच्या गर्दीत प्रचंड वाढ झाली. त्यामुळे मंदिराकडे जाणारा रस्ता अक्षरशः गर्दीने फुलून गेला. जितके भाविक दर्शन व महाप्रसाद घेऊन जात होते, तितकेच भाविक मंदिराकडे दाखल होत होते. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला होता. देवस्थान पंच कमिटीच्या सदस्यांनी व सेवेकऱयांनी भाविकांना श्रींचे दर्शन सुरळीत व्हावे व सर्वांना महाप्रसाद मिळावा यासाठी बरेच परिश्रम घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसाद वाटपाचे काम सुरू होते.
श्रीक्षेत्र वैजनाथ देवस्थानवर गर्दी
कुद्रेमनी : देवरवाडी येथील श्री क्षेत्र वैजनाथ देवस्थान मंदिरात हर हर महादेवाच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात देवदर्शन घेऊन महाप्रसादाने यंदाच्या चौथ्या श्रावणी सोमवार यात्रोत्सवाची सांगता झाली. दिवसभर हजारो भाविकांनी देवदर्शन घेतले.
सोमवारी पहाटे सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर भोगण यांच्या हस्ते मुख्य मंदिरातील शिवलिंगावर बेलपत्र वाहून दुग्धाभिषेक घालून पूजन करण्यात आले. देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष नारायण भोगण, सदस्य बसवराज पुजारी, बाळू करडे, शंकर गुंडप, वैजू केसरकर, शशिकांत जाधव, अरुण कांबळे, अमृत भोगण यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागाने मंदिरात आरती कार्यक्रम झाला.
सकाळी 11 वाजता नारायण भोगण यांच्या हस्ते वैजनाथ देवस्थानच्या पालखीचे पूजन झाले. वैजनाथाच्या नावानं चांगभलं, हर हर महादेवाच्या जयघोषात पालखी मिरवणूक झाली. मंदिराभोवती सवाद्य पाच पालखी प्रदक्षिणा घालण्यात आल्या. यानंतर शिनोळी येथील विजय कोकितकर यांच्या हस्ते महाप्रसादाचे उद्घाटन झाले. स्थानिक देवस्थान उपसमितीच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर देवदर्शन घेऊन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
देवदर्शनासाठी सकाळपासून भाविकांची ये-जा सुरू होती. देवस्थान उपसमितीच्यावतीने भाविकांना देवदर्शन सुरळीत होण्यासाठी मंदिर परिसरात केलेल्या सोयीमुळे देवदर्शन घेणे सुलभ झाले.
शिनोळी येथील अनेक ऑटो गॅरेज मालकांनी रस्त्यावर वाहनांसाठी मोफत पंक्चर व्यवस्था केली होती. देवरवाडी येथील वैजनाथ माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाहने पार्किंग व्यवस्थेसाठी दिवसभर परिश्रम घेतले. देवदर्शन सुरळीत होण्यासाठी चंदगड पोलिसांचे सहकार्य लाभले.