लोकनेत्यांनंतर सुमारे 42 वर्षांनी कॅबिनेट मंत्रिपद
प्रतिनिधी /नवारस्ता
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यानंतर दीर्घ कालावधीने पाटण तालुक्यातील देसाई घराण्यात आमदार शंभूराज देसाई यांच्या रूपाने पुन्हा एकदा मंत्रिपद मिळाल्यामुळे जिह्यात फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने अधिराज्य गाजविले. राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळून राज्याला नवी दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे पाटण तालुक्यातील देसाई घराण्यात 50 ते 80 च्या दशकापर्यंत सुमारे 20 ते 25 वर्षे राज्याची महत्वाची मंत्री पदे जनतेची अखंडित सेवा करीत होती. मात्र लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या निधनांनंतर देसाई घराण्यातील मंत्री पदाची परंपरा तब्बल 40 ते 42 वर्षे खंडित झाली.
लोकनेत्यांचे नातू आमदार शंभूराज देसाई यांनी 2004 पासून देसाई घराण्यातील गेलेली आमदारकी पुन्हा आली, मात्र मंत्रिपदाने देसाई घराण्याला गेल्या काही वर्षांपासून हुलकावणी दिल्याचे दिसत होते. आमदार ‘शंभूराज’ यांनी सलग तिसऱयांदा विधिमंडळात बाजी मारूनही मंत्री पदाने त्यांना हुलकावणी दिली होती. सन 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या कबिनेट मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा त्यांनी पराभव केला होता. 2004-2009 या पहिल्याच टर्ममध्ये विरोधी पक्षात असतानाही विधिमंडळाचा मानाचा उत्कृष्ट संसदपट्टचा हा पुरस्कार मिळवला. आपल्या कामाचा ठसा उमठला. विविध आयुधांचा वापर करून पाटण तालुक्याचा विकासात्मक कायापालट केला. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये 18824 चे मताधिक्य घेऊन ते पुन्हा विधानसभेवर निवडून गेले.
युती शासनाच्या सरकारमध्ये ही केवळ सत्ताधारी आमदार असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीमुळे पाटण तालुक्याला भरघोस असा निधी त्यांनी मिळवला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. आमदार देसाई यांनी शिवसेना पक्षाचे प्रतोद आणि पाच वेळा विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.
1997 साली हिंदू ह्रदयसम्राट कै.बाळासाहेब ठाकरे यांनी कारखाना कार्यस्थळावर येऊन आमदार शंभूराज देसाई यांना लाल दिव्यांची गाडी सोबत आणली होती. त्यावेळी आमदार देसाई यांनी शिवसेनत प्रवेश केला होता. पोलादी गृहमंत्र्यांचा नातू मंत्री म्हणून लाल दिव्याच्या गाडीतून रुबाबात फिरला पाहिजे, असे ते म्हणाले होते. त्यांचे स्वप्न आज पूर्ण झाल्याचे आठवण यानिमित्ताने समोर आली आहे.
राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्येही मंत्री देसाई यांनी राज्याच्या गृह, अर्थ अशा महत्वपूर्ण पाच खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्कृष्ट काम केले. मात्र राज्याच्या शिंदे फडणविस सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराज देसाई यांची मंत्री पदी वर्णी लागल्याचे स्पष्ट होताच जिह्यात एकच जल्लोष सुरू होऊन कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी करून आणि बॅनर उभारून ठिकठिकाणी आपला आनंद साजरा केला. नामदार देसाई हे मुंबईत असतानाच सोमवारी मध्यरात्री पाटण मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईत पोहोचले होते. सातारा जिह्यात शिवसेनेची खिंड लढवणारे आमदार शंभूराज देसाई यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळात स्थान देवून लोकनेत्यांच्या नंतर पाटण तालुक्याचा सन्मान केला आहे. तसेच दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्वप्न आज पूर्ण झाल्याचे आठवण यानिमित्ताने समोर आली आहे.
मिळेल त्या खात्याला न्याय देणार..!
स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना अपेक्षित असणारे बहुधा त्या ही पेक्षा अधिक प्राधान्य देऊन आपणाला मिळेल त्या खात्याला विभागाला न्याय देऊन राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
तसेच येणाऱया अडीच वर्षात या सरकारला प्रचंड मोठे विकासाचे काम करायचे आहे. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रसरकारचे संपूर्ण सहकार्य महाराष्ट्र राज्याला मिळणार आहे त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र हे विकासाचे पाहिले राज्य करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करणार असल्याची पहिली प्रतिक्रिया नवनिर्वाचित मंत्री ना शंभूराज देसाई यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना दिली.