वृत्तसंस्था/ सँटेनडेर (स्पेन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या विश्व कनिष्ठांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू शंकर मुथुस्वामीने पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठताना थायलंडच्या पी. तेरारसेकुलचा सरळ गेम्समध्ये पराभव केला.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात कनिष्ठ गटातील माजी टॉप सिडेड शंकर मुथुस्वामीने थायलंडच्या पी. तेरारसेकुलचा 40 मिनिटांच्या कालावधीत 21-13, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेमध्ये शंकर मुथुस्वामीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चीनच्या हू ऍनचा पराभव केला होता. ही स्पर्धा विविध वयोगटामध्ये खेळवली जात असून भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 9 पदकांची कमाई केली आहे. शंकर मुथुस्वामीने अंतिम फेरी गाठून भारताचे आणखी पदक निश्चित केले. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 5 कास्यपदके मिळवली आहेत. भारताने ही सर्व पदके एकेरीत पटकावली आहेत. यापूर्वी या स्पर्धेमध्ये 2016 साली भारताच्या सायना नेहवालने मुलींच्या कनिष्ठ गटातील विश्वविजेतेपद पटकावले होते.