Tarun Bharat

शापोरा किल्ल्याची दुरुस्ती करणार

मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती, किल्ल्याची केली पाहणी, पर्यटकांसाठी सुसज्ज प्रसाधनगृहाची करणार सोय

प्रतिनिधी /म्हापसा

शापोरा किल्ल्याची दुरुस्ती करून पर्यटकांसाठी सुसज्ज प्रसाधनगृह उभारण्यात येईल. हा किल्ला यापूर्वीच जतन करून सुशोभीकरणाचे काम या आधीच सुरू केले आहे. स्थानिकांच्या सोयीसाठी व पर्यटनदृष्टय़ा हा किल्ला सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. त्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती  पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. बुधवारी सकाळी बार्देशातील शापोरा येथील पुरातन किल्याला भेट देत तेथील परिसराची पाहाणी केल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, सरपंच चिमुलकर तसेच इतर सर्व पंच सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी किल्ल्याची झालेली पडझड तसेच पायथ्याशी अस्ताव्यस्त बेकायदा उभारण्यात आलेले झोपडीवजा गाळे व तेथील परिसरात जमा झालेला कचरा पाहून मंत्री बरेच संतप्त झाले. यावेळी किल्ल्याच्या पायथ्याशी बेकायदा उभारलेले गाळे 24 तासांच्या आत हटविण्याचे आदेश मंत्री फळदेसाई यांनी मामलेदारांना दिले.

बेकायदेशीर झोपडपट्टय़ा उभारू देणार नाही

पुरातन खात्याची जागा ही कुणाच वैयक्तिक मालकीची नव्हे, आपण येथे गैरकृत्य व बेकायदेशीर धंदे कदापी सहन करून घेणार नाही. आमदार डिलायला लोबो यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी. परप्रांतीयांना येथे थारा दिला जाणार नाही आणि बेकायदेशीर झोपडपटय़ा येथे उभारू देणार नाही. अशा बेकायदेशीर झोपडय़ा येथे आल्यास त्याला पूर्ण मामलेदार जबाबदार राहतील, असा इशाराही यावेळी मंत्र्यांनी दिला.

मंत्र्यांशी हुज्जत घालणाऱया परप्रांतीयाला अटक

दरम्यान बेकायदा गाडय़ांची पाहाणी करतेवेळी एका परप्रांतीय तरुणाने मंत्री फळदेसाई यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याने हणजूण पोलिसांकडून त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्या तरुणाच्या विरोधात कलम 151 खाली गुन्हा नोंदवून त्याला कायदेशीर अटक करण्यात येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक फ्रान्सिस झेवीयर यांनी दिली.

पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील मंदिरांची नासधूस तसेच मोडतोड झालेल्या मंदिरांच्या पुनर्वसनासाठी सरकार सर्वतोपरीने आर्थिक मदत करणार असल्याचे सांगतानाच त्यासाठी देवस्थान समित्यांकडून पुरावे सादर करावे लागणार असल्याचे मंत्री फळदेसाई यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.

यावेळी शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, हणजूण-कायसुव पंचायतीचे सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर, प्रतिमा गोवेकर, सुरेंद्र गोवेकर, हनुमंत गोवेकर, दिनेश पाटील, अन्य पंचायत मंडळाचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

बेंडला येथे पर्यटक बस उलटून बाराजण जण जखमी

Amit Kulkarni

‘तरुण भारत’बद्दल मुख्यमंत्र्यांची आक्षेपार्ह टीका

Omkar B

नाणूस बेतकेकरवाडा सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थानच्या जत्रोत्सवात धोंडगण 17 अग्निदिव्य पार करणार

Amit Kulkarni

मुसळधार पावसाने काणकोण तालुक्याला झोडपले

Omkar B

वास्कोतील फुटपाथवर झालेल्या मारहाणीत भिकाऱयाचा मृत्यू, वास्कोतील युवकाला अटक

Amit Kulkarni

म्हापशातील गणपतीचे विसर्जन सायं. 6 ते 10पर्यंत टप्प्याटप्प्यात होणार

Omkar B