राज्य कुस्तीगीर परिषदेवरील मान्यता रद्दची कारवाई मागे घेण्यासाठी उचलली पावले; भारतीय कुस्ती महासंघाबरोबर करणार चर्चा
संग्राम काटकर कोल्हापूर
भारतीय कुस्ती महासंघाचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता काढून घेण्याची धडक कारवाई केल्यानंतर राज्याच्या कुस्ती जगतात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे राज्यातील मल्लांसह कुस्तीशी संबंधित सर्व घटकांवर परिणाम होणार असून फटकाही बसणार आहे. अनियमित व्यवहारासंदर्भात वारंवार सूचना, ताकीद दिल्यानंतरही परिषदेने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच महासंघाने मान्यता काढून घेण्याचे कठोर पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, महाराष्ट्रातील कुस्ती अडचणीत आल्यानंतर आता ज्येष्ठ नेते तथा परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आता आखाडय़ात उतरले आहेत. दिल्लीतील पातळीवर त्यांनी कारवाई रद्द होण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा जमा-खर्च, 15 व 23 वर्षाखालील मल्लांच्या कुस्ती स्पर्धा आयोजनास परिषदेने दाखवलेली असमर्थता यासह विविध प्रकारच्या तक्रारी भारतीय कुस्ती महासंघाकडे केल्या जात होत्या. या तक्रारींमध्ये जिल्हा पातळीवरील काही कुस्ती संघटनानी केलेल्या विविध तक्रारींचाही समावेश आहे. मधल्या काळात परिषदेविरुद्ध तक्रारी वाढत असून त्यात सुधारणा न केल्यास परिषदेची महासंघाशी असलेली संलग्नता रद्द केली जाईल, असा इशाराही दिला होता. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने इशारा दिल्याप्रमाणे कारवाई करण्याचा निर्णय महासंघाने घेतला होता. या निर्णयावर नुकत्यात नवी दिल्ली येथे महासंघाच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब केल्याचे महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, महासंघाच्या कारवाईनंतर हडबडून जागे झालेल्या परिषदेने भारतीय कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱयांनी संपर्क साधून कारवाई मागे घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. या माहितीला परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. कुस्तीगीर परिषदेची मान्यता रद्द केल्यानंतरआगामी काळात ऍड हॉक समितीची स्थापन करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. ही समिती परिषदेप्रमाणे स्पर्धा, निवड चाचणी, शिबिरे, पंच शिबिरे, मल्लांना मदत व इतर प्रशासकीय कामे करणार असल्याचेही महासंघाने स्पष्ट केले आहे.
परिषदेवरील आरोप आणि कारवाई
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस म्हणून बाळासाहेब लांडगे गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. शरद पवार जरी अध्यक्ष असले तरी परिषदेवर लांडगे यांचा वरचस्मा आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीबरोबर इतर बाबींबाबत कुस्तीगीर परिषदेतील काही पदाधिकाऱयांबरोबरच राज्यातील जिल्हा संघटनांच्याही तक्रारी आहेत. पण पवार यांचे पाठबळ असल्याने लांडगे यांच्या स्थानाला आजवर कुणीही धक्का पोहचवू शकले नाही. दरम्यान, भारतीय कुस्तीगीर महासंघाकडे परिषदेविरोधात गेल्या काही वर्षात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. स्पर्धा आयोजन, संघ निवड चाचणी, शिबिर आयोजन या गोष्टींबरोबरच जमा-खर्चासंदर्भातील तक्रारींचा त्यात समावेश होता. महासंघाने या संदर्भात परिषदेला वारंवार जागे करत खुलासा मागितला होता, पण त्याला प्रतिसाद देण्यात न आल्याचे मान्यता रद्दची कारवाई केल्याचे महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शरद पवार अध्यक्ष असलेल्या संघटनेवर कारवाई
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रृजभूषण शरण सिंग आहेत. त्यांच्या रूपाने भाजपचे महासंघावर वर्चस्व आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कारभाराविषयी काही तक्रारी असल्या तरी थेट मान्यता रद्दची कारवाई करण्याचे धाडस करण्यात आले आहे. यामागे राजकारण असल्याचीही चर्चा आहे. पवार अध्यक्ष असलेल्या संघटनेला हात लावताना प्लनिंग झाल्याचेही बोलले जात आहेत. विशेष म्हणजे मान्यता रद्दची कारवाई करण्यात आली असली तर त्या संदर्भातील अधिकृत पत्र अथवा ई-मेल परिषदेला प्राप्त झाला नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे कारवाईच्या मागे असणाऱया राजकारणाच्या चर्चेची शक्यता गडद होत आहे.
कारवाई रद्दसाठी शरद पवार मैदानात
कुस्तीगीर परिषदेची मान्यता रद्द झाल्यानंतर अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार ऍक्टीव्ह झाले आहे. त्यांनी दिल्लीत असणारी आपली संपूर्ण ताकद आणि संबंध वापरण्यास सुरू केली आहे. मान्यता रद्दच्या कारवाईनंतर आगामी काळात होणारे परिणाम परिषदेला सहन करावे लागणार आहेत. त्याची कल्पना पवार यांना आहे. त्यामुळे त्यांनी गतिमान हालचाली सुरू केल्या आहेत. महासंघावर भाजपचे वर्चस्व आहे. अध्यक्ष भाजपचे खासदार आहेत. त्यांच्याकडून कारवाई मागे घेण्याच्या दृष्टीने पवार यांनी फिल्डिंग लावली असून त्यांच्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पवारांचे डॅमेज कंट्रोल
भारतीय कुस्ती महासंघाने मल्लांचा विचार करुन लवकरात लवकर मान्यता रद्दचा निर्णय मागे न घेतल्यास मल्लांना मदतीपासून ते आवश्यकत्या सर्व सोयी-सुविधा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल, याची जाणीव पवार यांना आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्याचे पवारांचे प्रयत्न आहेत. महासंघाकडे पुणे जिल्हा कुस्ती संघटनेसह ज्यांनी ज्यांनी परिषदेविरोधात तक्रारी केल्या आहेत, त्यांचे निरसन करण्याबरोबरच तक्रारदारांना विश्वास घेऊन पुढील दिशा ठरवण्याच्या हालचाली पवार यांनी सुरु केल्या आहेत. येत्या 8 ते 10 दिवसात सर्वकाही ठिक होईल, असे चित्र सर्वांना दिसेल, असे परिषदेशी संबंधीत जाणकार सांगत आहेत.
शरद पवारांची शिष्टाई यशस्वी होणार ?
शरद पवार यांनी दिल्लीत गेल्यानंतर महासंघाच्या पदाधिकाऱयांशी चर्चा करुन कुस्तीगीर परिषदेतील ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, शिवाय परिषदेने काही चुकीचे निर्णय घेतले असतील तर तेही दुरुस्त करु असे स्पष्ट केले आहे. पवारांच्या या भूमिकेला यश मिळेल, अशी अपेक्षा कुस्ती क्षेत्रातील स्थानिक जाणकारांनी व्यक्त केली.