ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनेच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवरील मैदानासाठी पालिकेकडे अर्ज केला आहे. पण पालिकेने अद्याप यावर कोणताही निर्णय दिलेला नाही. दसरा मेळाव्यावरुन निर्माण झालेल्या वादात आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण त्यावरुन कोणताही वाद होता कामा नये. वाद असतील तर ते टाळले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री राज्याचे असतात. ते कोणत्याही एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांनी संघर्षाची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. सामोपचाराने त्यांनी वाद सोडवला पाहिजे, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
अधिक वाचा : राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करा; मुख्यमंत्री शिंदेंची राज्यपालांकडे मागणी
दरम्यान, शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक अतूट नातं आहे. या निमित्ताने राज्यातील शिवसैनिक एकत्र येतात. यंदा 5 ऑक्टोबरला दसरा आहे. गेली अनेक वर्ष परंपरेनुसार बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होत आला आहे. विचारांचं सोनं लुटून शिवसैनिक पक्षाचं काम जोमानं करायचा पण आता शिवसेनेत एकनाथ शिंदेनी बंड केल्याने चित्र पालटलं आहे. शिवसेना ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची हा प्रश्न आता न्यायालयात प्रलंबित आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाकडे जाईल अद्याप सांगता येत नाही.
पण, तत्पूर्वी दसरा आल्याने शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटानेही दावा केला आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी अनिल परब यांच्याकडून 23 ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर दोन दिवसांपूर्वी सदा सरवणकर यांनी शिंदे गटाला दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आहे. पालिकेने यावर कोणताही निर्णय दिला नसला तरी शिंदे शरद पवारांचा सल्ला मानणार की शिवाजी पार्कवरील मैदानासाठी आग्रह कायम ठेवणार, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.