पुणे / प्रतिनिधी :
बारामती लोकसभा मतदारसंघात मी दोन दिवस दौरा केला असून, यादरम्यान मला बारामतीमध्ये भयाचे वातावरण दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे, मात्र त्यांनी कुठली सहकारी संस्था सुरू केली, हे दाखवून द्यावे, असे आव्हान केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल (Pralhad singh Patel) यांनी पत्रकार परिषदेत दिले.
पटेल म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये भाजपचा खासदार निवडून येईल, याची आम्हाला खात्री आहे. जनतेचीही अशीच मानसिकता आहे. बारामतीच्या विकासाचा अनुशेष आम्ही भरून काढू. शरद पवार यांनी कुठली सहकारी संस्था सुरू केली? मला मिळालेली माहिती आणि माझ्या वाचनानुसार पवारांनी एकही सहकारी संस्था नव्याने सुरू केली नाही. त्यांच्याबद्दल आम्हास आदर असला, तरी या गोष्टी जनतेसमोर येणे आवश्यक आहे.
अधिक वाचा : पुण्यातील सोन्याचांदीच्या चोरीचे सांगली कनेक्शन
कऱहा नदीत प्रचंड जलप्रदूषण झाले आहे. या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासह भूमिगत गटारे स्थानिक प्रशासनाने प्रस्तावित केल्यास त्यासाठी माझ्या मंत्रालयाकडून निधी दिला जाईल. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने भाजप पुन्हा सत्तेत येईल. यात शंका नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विक्री करण्यात येते. जगाच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था सक्षम असल्याचा दावाही पटेल यांनी केला.
या वेळी माजी मंत्री राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, संजय भेगडे, आमदार भीमराव तापकीर, भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, उपाध्यक्ष राहुल शेवाळे, धर्मेंद्र खंडारे आदी उपस्थित होते.