Tarun Bharat

कोल्हापूरच्या संकल्प सभेतून शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले…

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील सरकार होतं. देशासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रितपणाने कष्ट घेतले गेले आणि अनेक क्षेत्रांमध्ये या देशाची उन्नती कशी होईल, याची खबरदारी घेतली गेली. २०१४ ची निवडणूक ही वेगळी झाली आणि भाजपाच्या हातात सत्ता आली. लोकांचा कौल होता आणि तो आम्ही स्वीकारला. परंतु आपण बघतो आहोत, सत्ता हातात आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग सामान्य माणसात एकवाक्यता कशी राहील, हा देश एकसंध कसा राहील, लोकांचं दु:ख कमी कसं होईल, समाजातील सगळे घटक एका विचाराने कसे राहतील ही जबाबदारी कोणत्याही राष्ट्रीय नेतृत्वाच्या आणि सरकारच्या प्रमुखांची असते, पण आज चित्र वेगळं दिसतय. ही जबाबदारी भाजपने घेतली नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे.

कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प सभेतून बोलताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच, आज हा देश एकसंध ठेवण्याचं आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. असंही त्यांनी बोलून दाखवलं.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, दिल्लीत काही घडलं तर त्याचा संदेश जगात जातो आणि जगात या देशात अस्थिरता आहे, अशाप्रकारची भावना निर्माण होते. तुमच्या हातात सत्ता आहे आणि तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही? आणि हे केवळ दिल्लीतच नाही तर, दोन दिवसांपूर्वी मी कर्नाटकात होतो. मला समजलं की हुबळी सारख्या ठिकाणी जातीय दंगली झाल्या. आश्चर्य वाटेल अशाप्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घेतले गेले. समजातील जे लहान घटक आहेत, आज कर्नाटकातील समाजातील अल्पसंख्याक लोकांच्याबद्दल त्या ठिकाणी जाहीर बोर्ड लावले, की या गावात या ठिकाणी या अल्पसंख्याकाचं दुकान आहे, त्या दुकानात कुणीही खरेदी करू नये. या ठिकाणी अल्पसंख्याकाचं रेस्टॉरंट आहे तिथे कुणी जाऊ नये. काय समजाव? आणि हा संदेश देणारे लोक सत्ताधारी पक्षाचे आहेत. हे चित्र शेजारच्या राज्याचं आहे. दिल्ली असेल, शेजारचं राज्य असेल, जिथं जिथं भाजपाच्या हातात सत्ता आहे, त्या ठिकाणची हीच अवस्था आहे. त्यामुळे एकप्रकारच्या आव्हानाची अवस्था आज आपल्या सर्वांच्या समोर आहे.” असं शरद पवारांनी यावेली सांगितलं.

कोल्हापूर उत्तर निवडणुकीवरही शरद पवारांनी भाष्य केले. त्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिल्याबद्दल त्यांनी कोल्हापूरच्या जनतेचे आभार मानले. तसेच देशात भाजपची सत्ता असताना कोल्हापुरात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला, हा कोल्हापूरच्या जनतेचा विजय असल्याचे ते म्हणाले.

तसेच काश्मीर फाईल्स चित्रपटावर बोलताना पवार यांनी सडकून टीका केली. या चित्रपट दाखवण्यामागे भाजपचा हेतू जातीय तेढ निर्माण करण्याचा होता, तसा प्रचारही भाजपकडून केला गेला. मात्र कोल्हापूरची जनता शहाणी आणि राष्ट्रप्रेमी आहे. तुम्ही कोल्हापूरकर लय हुशार आहात. त्यांच्या करेक्ट बंदोबस्त केला. मला वाटलं होतं निकाल वेगळा लागेल, कोल्हापूरच्या निकालाने माझी काळजी वाढली होती. पण कोल्हापूरकरांनी योग्य तो निर्णय घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून दिलं. हा निकाल अत्यंत चांगला लागला. कोल्हापूरच्या जनतेने महाराष्ट्र जनतेला एक वेगळा विचार दिला, असे ते यावेळी म्हणाले.

राज्यात सुरु असलेल्या कारवायांवरही शरद पवारांनी भाष्य केलं. अलीकडच्या काळात अनेक गोष्टी झाल्या. सत्ता येते जाते, पण सत्ता डोक्यात जाऊ देऊ नये. सत्ता असल्यास त्याचा गैरवापर व्हायला नको, असा टोला शरद पवारांनी भाजपला लगावला आहे. तसेच या जनतेला ईडी, सीबीआय या यंत्रणा माहिती नव्हत्या, आता या यंत्रणा जनतेला चांगल्याच माहित झाल्या आहेत. आता या यंत्रणांचा वापर करून दबाव टाकला जातोय, पण केंद्राला वाटत असेल राष्ट्रवादी ईडी, सीबीआयच्या दबावाला बळी पडेल, पण राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता याला मजबुतीने आणि धीराने सामोरे जाईल, त्याचा समाचार त्याच पद्धतीने घेतला जाईल, असा इशाराही यावेळी पवार यांनी दिल.

तसेच जे लोक शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव का घेतो हे विचारतात त्याला महाराष्ट्र कळलेला नाही, असा टोलाही यावेळी बोलताना शरद पवारांनी लगावला आहे.

Related Stories

वेतवडे म्हैस चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक

Archana Banage

कोल्हापूर जिल्हा बँक : रिपाइ जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : काळाम्मावाडी धरण ७६.४१ टक्के भरले, दुधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर

Archana Banage

…तर आरोग्य विभगाच्या परीक्षा तात्काळ रद्द : अजित पवार

Tousif Mujawar

निकाल तोंडावर, काँग्रेससमोर अनेक आव्हाने

Patil_p

राज्यात ऊन-पावसाचा खेळ

datta jadhav