दांडिया, गरबा, कीर्तन, भजनांची पर्वणी : फोंडा तालुक्यात आकर्षण ठरणार मखरोत्सव
प्रतिनिधी /पणजी
आज सोमवार दि. 26 सप्टेंबरपासून घटस्थापनेसह शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होत असून त्यासाठी राज्यातील सर्व देवींच्या मंदिरात सज्जता करण्यात आली आहे. तसेच एकूण 10 दिवस विजयादशमीपर्यंत विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. दांडिया कार्यक्रम, दांडिया स्पर्धा हा त्यातील प्रमुख कार्यक्रम असून देवीचे मखर सजावट व इतर धार्मिक विधींना त्यात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार असून त्याची तयारी मंडळांनी पूर्ण केली आहे. शाळेतही शारदोत्सव साजरा करण्यात येणार असून तेथेही त्याची सज्जता झाली आहे.
दांडियालाही आलेय महत्व
गोव्यातील नवरात्रोत्सवात आता दांडियाला महत्त्व आले असून त्यांच्या स्पर्धाही मोठय़ा प्रमाणात आखल्या जात आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातही या दांडिया नृत्याचे गट तयार झाले असून ते स्पर्धेत भाग घेत आहेत आणि हे नृत्य त्यामुळे गोव्यातही लोकप्रिय होऊ लागले आहे. ते पाहण्यासाठी विविध ठिकाणी लोकांची गर्दी होत असून रात्री उशिरापर्यंत ते नृत्य 10 दिवस रंगणार आहे.
नवरात्रोत्सवात कलाकारांना संधी
नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंदिरातून रंगीत दिव्यांची रोषणाई करण्यात आली असून कीर्तन, भजन असे कार्यक्रमही आखण्यात आले आहेत. दांडिया नृत्यातून विविध धर्माचे लोक एकत्र येऊ लागले असून नवरात्रोत्सव हा राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दांडीया नृत्य व इतर स्पर्धा तसेच नवरात्रोत्सवाचे फलक दिसत असून त्यातून अनेक कलाकारांना संधी प्राप्त होणार आहे. नवरात्रोत्सवाचे हे पर्व गोव्यात प्रतिवर्षी वाढत असून त्याचे स्वरुप व्यापक होत असल्याचे दिसून येत आहे.
विविध सामाजिक संस्था, क्लब यांनी दांडिया नृत्य स्पर्धा आयोजित केली असून त्यात लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दोन वर्षे कोरोनामुळे हा नवरात्रोत्सव मर्यादित स्वरुपात झाला परंतु यावर्षी त्याचे स्वरुप भव्य-दिव्य असणार आहे.