वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अलीकडेच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये तीन सुवर्णपदके मिळविणाऱया भारताच्या अचंता शरथ कमलने पुढील महिन्यात चीनमध्ये होणाऱया विश्व टेबल टेनिस चॅम्पियनशिपमधून माघार घेतली आहे. वैयक्तिक कारणास्तव त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा चीनमधील चेंगडू येथे होणार असून शरथ कमलने राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष एकेरी, मिश्र दुहेरी व सांघिक प्रकारात सुवर्ण मिळविले. त्याच्या गैरहजेरीत चीनमधील स्पर्धेत जी. साथियान भारताचा प्रमुख आव्हानवीर असेल. जागतिक क्रमवारीत तो 37 व्या स्थानावर आहे. महिलांमध्ये मनिका बात्रा भारताची प्रमुख आव्हानवीर असेल. ती जागतिक क्रमवारीत 44 व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत बात्राकडून नीष्प्रभ प्रदर्शन झाले होते. सुधारित कामगिरी करून त्याची भरपाई करण्याचा ती या स्पर्धेत प्रयत्न करेल.
या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला संघ ः पुरुष-जी.साथियान, सनिल शेट्टी, हरमीत देसाई, मुनश शहा, मानव ठक्कर. महिला-मनिका बात्रा, श्रीजा अकुला, रीथ रिष्या, दिया चितळे, स्वस्तिका घोष. प्रशिक्षक-एस.रमन, अनिंदिता चक्रवर्ती व ख्रिस ऍड्रियन पीफर. मसाजर – हरमीत कौर.