मांसाहार केल्याचे दिले कारण
पुणे / प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे बाहेरूनच मुखदर्शन घेतले. मासांहार केल्याने मंदिरात न जाणे पवार यांनी पसंत केले. शरद पवार हे नास्तिक असल्याचा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी दगडूशेठ मंदिराची धरलेली वाट व गणरायाचे बाहेरूनच घेतलेले मुखदर्शन चर्चेचा विषय ठरले.
दगडूशेठच्या दर्शनापूर्वी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या भिडे वाडय़ाची पाहणी केली. यावेळेस त्यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते. भिडे वाडय़ाच्या पाहणीसाठी शरद पवार येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विश्वस्त मंडळींना मिळाली. त्यानंतर गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी येण्याचा आग्रह त्यांच्याकडून करण्यात आला. या वेळी शरद पवार यांनी भिडे वाडय़ाची आणि मंदिर परिसराची बाहेरून पाहणी केली.
या वेळी मंदिराच्या विश्वस्तांनी पवार यांचे स्वागत केले. मात्र, ते मंदिरामध्ये गेले नाहीत. पवार यांनी मांसाहारी जेवण केल्याने ते मंदिरामध्ये गेले नाहीत. चुकीचा पायंडा पडता कामा नये, असे त्यांनी मला सांगितले, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.