मंदिरांसह घरोघरी आज घटस्थापना : अंबाबाईची सिंहासनारुढ रुपात तर तुळजा भवानीची खडी पूजा
प्रतिनिधी/कोल्हापूर
करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेच्या 307 व्या वर्षारंभाच्या योगावर आणि घटस्थापनेसारख्या मांगल्याच्या क्षणांच्या साक्षीने सोमवार दि. 26 सप्टेंबपासून शारदीय नवरात्रौत्सावाला आरंभ होत आहे. सकाळी आठ वाजता अंबाबाई मंदिरात तर दहा वाजता तुळजा भवानी मंदिरात मानकऱ्यांच्या हस्ते घटस्थापना केली जाईल. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार तुळजा भवानीच्या पादुका विराजमान केलेली पालखी अंबाबाईच्या भेटीसाठी बाहेर येईल. अंबाबाई मंदिरात देवस्थान समितीचे पदाधिकारी व मानकरी तिचे स्वागत करतील. यानंतर पालखी सोबतचे राजोपाध्ये गाभाऱयात जाऊन आरती करुन देवीच्या चरणावर मानाचे विडे अर्पण करतील.
शहरासह जिल्हय़ातील सर्व मंदिरांमध्ये घटस्थापना करुन नवरात्रौत्सवाला प्रारंभ केला जाईल. देवदेवतांची आळवणी करणारी गाणीही वाजू लागतील. घरोघरी देव बसवण्याच्या विधीलाही सुरुवात होईल. दुपारी एकच्या सुमारास सिंहासनारुढ देवी अशी करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा बांधण्याला प्रारंभ होईल. भवानीमातेही खडी पूजा बांधण्यात येईल. शहरवासिय पूजांचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडतील.
रात्री साडेनऊच्या सुमारास अंबाबाईचा पालखी सोहळा होईल. कोरोनामुळे गेली दोन वर्षे निवडक मानकऱयांच्या उपस्थितीत पालखी सोहळा साजरा करावा लागला होता. यंदाच्या नवरात्रौत्सवाला मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंध नसल्याने सोहळा भाविकांच्या उपस्थितीतच साजरा केला जाणार आहे. एकशिखर रुपात पालखीला फुलांनी सजवले जाईल. तमाम करवीरवासियांनी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी केले आहे.
हे ही वाचा : नवरात्रौत्सवासाठी अवघा जिल्हा सज्ज
दुर्गाज्योत प्रज्वलनासाठी 38 मंडळे मंदिरात
नवरात्रौत्सवाच्या पुवसंध्येला सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, अहमदनगर या जिह्यांमधील 38 मंडळे दुर्गाज्योत प्रज्वलन करुन नेण्यासाठी अंबाबाई व तुळजा भवानी मंदिरात दाखल झाले होते. त्यांनी दुर्गाज्योती प्रज्वलन करुन पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवदेवतांच्या नावांचा जयघोष केला. जयघोषातच मंदिराला प्रदक्षिणा घातली.
भक्तांना अभिषेक करता येणार
दोन वर्षे कोरोनामुळे अंबाबाईला अभिषेक करता आला नव्हता. यंदा मात्र निर्बंध नसल्याने अभिषेक करता येणार आहे. देवस्थान समितीच्या नियोजनानुसार अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात सकाळी साडेसहा, साडेआठ आणि साडेअकरा वाजता उत्सवमूर्तीवर अभिषेक विधी होणार आहेत. या विधीसाठी भाविकांकडून 750 रुपये घेतले जातील.
प्रवेशद्वारांवर आत्याधुनिक 5 मेटल डिटेक्टर
शस्त्र तपासणीच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराला आरबीएल बँकेच्या ताराबाई पार्क शाखेने 3 आणि स्टेट बँकेने 2 डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर दिले आहेत. यापैकी 2 डिटेक्टर अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ आणि उर्वरीत तिन्ही दरवाजाजवळ प्रत्येकी 1 डिटेक्टर लावण्यात आले आहेत. या डिटेक्टरमधील अल्ट्राझोन यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक भाविकाच्या शरिरातील 18 भागांची तपासणी होणार आहे. भाविकाचा फोटोही क्लिक होणार आहे. शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणाही या पाचही डिटेक्टरमध्ये आहे. पोलीस प्रशासनाच्या सुचनांनुसार मुळचे डिटेक्टर बदलून त्यांच्याजागी हे नवे डिटेक्टर लावले असल्याचे अंबाबाई मंदिर सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील राहुल जगताप यांनी सांगितले.