वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेअर बाजारात चालू आठवडय़ातील पहिल्या सत्रात सोमवारी स्टील कंपन्यांच्या समभागात मोठय़ा प्रमाणात पडझड झालेली पहावयास मिळत आहे. सरकारने स्टीलवरील एक्सपोर्ट शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या अगोदर भारतीय स्टील निर्यातीवर शून्य डय़ूटी लावली जात होती. मात्र सरकराने यावर जवळपास 15 टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणास्तव शेअर बाजारातील स्टील कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत.
स्टील कंपन्यांमधील पडझड
दिग्गज कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे समभाग सोमवारच्या सत्रात जवळपास 14 टक्क्यांनी घसरणीत राहिले आहेत. घसरणीसह भाव 1007.30 वर आले होते. यामध्ये बीएसईवर दुपारपर्यंत 1026.20 रुपयावर राहिले होते. तर जिंदाल स्टील ऍण्ड पॉवरचे समभाग 13 टक्क्यांच्या घसरणीसोबत 478.90 रुपयावर आले. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असणाऱया सेलचे समभाग हे 13 टक्क्यांनी घसरले असून जेएसडब्लू स्टीलचे समभाग 11 टक्क्यांनी नुकसानीत राहिले. गोदावरी पॉवर ऍण्ड पोलादचे समभाग हे 20 टक्क्यांवर लोअर सर्किटला टच करुन 311.70 टक्क्यांवर राहिल्याची नोंद झाली आहे.
निर्यातीवर टॅक्स वाढल्याचा प्रभाव
सरकारने स्टील निर्मितीसाठी उपयुक्त आर्यन व पेलेट्स यासारख्या कच्च्या मालावर निर्यात शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. यामुळे सर्वप्रकारच्या लोखंडावर निर्यात शुल्क 30 टक्क्यांनी वाढून 50 टक्के करण्यात आले आहे. तसेच हॉट-रोल्ड आणि कोल्ड-रोल्ड स्टील उत्पादनावर निर्यात शुल्क हे 15 टक्के आकारले आहे. या सर्व घडामोडीचा परिणाम हा शेअर बाजारातील स्टील कंपन्यांच्या कामगिरीवर राहिल्याचे दिसून आले .