ई-सायकलसाठी तासाला 30 रुपये, साध्या सायकलकरिता 10 रुपये भाडे निश्चित
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरवासियांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत शेअरिंग ई-सायकल व सायकल उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गेल्या चार दिवसांपासून शहरातील 20 पैकी 10 स्टेशनवर या सायकल्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरवासियांना स्मार्ट बसथांबे, शुद्ध पिण्याचे पाणी, ई-टॉयलेट त्याचप्रमाणे स्मार्ट रोड अशा विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यापैकी काही सुविधांची देखभाल केली जात नसल्याने बंद झाल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरवासियांसाठी भाडेतत्त्वावर ई-सायकल आणि साध्या सायकली उपलब्ध करण्याची तरतूद केली होती. याअंतर्गत ‘याना’ या कंपनीने शेअरिंग ई-सायकल उपलब्ध करून देण्याचे कंत्राट घेतले होते.
सदर योजना बेळगाव शहरात कार्यान्वित झाली असून 20 पैकी 10 स्टेशनवर ई-सायकल्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रत्येक स्टेशनवर 10 ते 15 सायकली ठेवण्यात आल्या आहेत. सदर सायकलचे भाडे तासाला आकारले जाते. ई-सायकलसाठी ताशी 30 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. साध्या सायकलकरिता ताशी दहा रुपये भाडे आकारले जाते. सायकल घेण्यासाठी ‘याना’ या कंपनीच्या अॅपवर सर्व माहिती नोंद करणे आवश्यक आहे. तसेच 520 रु. अनामत रक्कम भरणे बंधनकारक आहे.
अॅपद्वारे मिळणाऱ्या स्कॅनरद्वारा सायकलवरील क्यूआरकोडवर स्कॅन केल्यास सायकलचा लॉक खुला होतो. त्यानंतर कोणत्याही ठिकाणी सायकल घेऊन जाता येते. मात्र ‘याना’ कंपनीने निश्चित केलेल्या सायकल सेंटरवर सायकल ठेवल्यानंतरच किती भाडे भरावे लागणार, याची माहिती मिळते. ती रक्कम ऑनलाईनद्वारे भरावी लागते. ही रक्कम जमा न केल्यास अनामत रकमेतून कापून घेतली जाते. या शेअरिंग सायकलची सुविधा शहरात सुरू झाली असून सध्या याबाबत शहरवासियांमध्ये जागृती निर्माण झाली नाही. सर्वत्र मोटारसायकल वापरली जाते. त्यामुळे शेअरिंग सायकलला प्रतिसाद मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.