महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती : ‘चाहत्या’ने रेकी केल्याचे तपासात स्पष्ट
चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पंजाब पोलिसांनी आठ शार्पशूटरची ओळख पटली असून ते पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व शार्पशूटर गँगस्टर लॉरेन्स टोळीचे आहेत. तसेच महाराष्ट्रातील शार्पशूटरची नावे संतोष जाधव आणि सौरव महाकाल अशी असून ते पुणे परिसरातील असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
29 मे रोजी मानसा येथे एका पंजाबी गायक मुसेवाला याची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा तपास विविध तपास यंत्रणांकडून केला जात असून सर्व संशयितांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याचदरम्यान, पंजाब पोलिसांनी केकरा नावाच्या व्यक्तीला मानसा येथून अटक केली आहे. यानेच मुसेवालाचा शौकीन (चाहता) असल्याचे भासवून त्याची रेकी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या केकरा नामक इसमानेच मुसेवालाच्या हालचालीची माहिती शार्पशूटर्सना दिली. त्यानंतरच हत्येचा अचूक कट आखण्यात आल्याचे समजते.
पंजाब पोलिसांनी अटक केलेला संशयित केकरा हा सिरसा येथील कालियानवली येथील रहिवासी आहे. तो एका मित्रासोबत मूसेवालाच्या घरी चाहता म्हणून गेला होता. तिथेच त्याने चहा-पान झाल्यानंतर सेल्फीही काढला होता. मुसेवाला साध्या वाहनातून जात असून त्याच्यासोबत बंदूकधारी रक्षक व बुलेटप्रूफ फॉर्च्युनरही नसल्याची माहिती त्याने हल्लेखोरांपर्यंत पोहोचवली होती. यानंतर थोडय़ा अंतरावर येताच मुसेवाला गोळीबारात ठार झाला होता.
आठ हल्लेखोरांचा सहभाग उघड
तरनतारन येथील जगरुपसिंग रुपा आणि पंजाबमधील मूसेवाला खून प्रकरणातील मनप्रीत मन्नू, हरियाणातील सोनीपत येथील प्रियवर्त फौजी आणि मनप्रीत भोलू, महाराष्ट्रातील संतोष जाधव आणि सौरव महाकाल यांच्यासह सीकर-राजस्थानमधील सुभाष बानुदा, हरकमल सिंग रानू यांचा हत्या करण्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली. मुसेवाला यांच्या हत्येच्या तीन दिवसांपूर्वी हे सर्वजण कोटकपुरा महामार्गावर एकत्र जमल्याचेही चौकशीअंती स्पष्ट झाले आहे.
हत्येचा मास्टरमाइंड सचिन बिश्नोई
सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार म्हणून पंजाब पोलिसांनी सचिन बिश्नोईची ओळख पटवली आहे. मुसेवाला यांच्या हत्येचा संपूर्ण कट सचिननेच रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शार्पशूटर नेमून त्याने मुसेवालाचा खून केला. सचिन हा तिहार तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्सचा भाचा आहे. एका टीव्ही चॅनलला फोन करून त्याने हत्येची कबुली दिली होती. पोलिसांनी त्याचा आवाजही तपासला असून संबंधित सचिन बिश्नोईच असल्याची पुष्टी मिळाली आहे.