17 ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. याचदरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर हे पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक पडताळून पाहत आहेत. परंतु यासंबंधी त्यांनी अंतिम निर्णय घेतलेला नाही. थरूर याबद्दल लवकरच स्वतःचा निर्णय घेऊ शकतात. पक्षाध्यक्ष पदाच्या शर्यतीत सामील होणार की नाही यावर टिप्पणी करण्यास थरूर यांनी नकार दिला आहे. परंतु एका मल्याळी वृत्तपत्रात लेख लिहित मुक्त वातावरणात निष्पक्ष निवडणूक करविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यपदासाठीही पक्षाने निवडणुकीची घोषणा करावी. काँग्रेस कार्यकारिणी अन् प्रदेश समिती प्रतिनिधींना पक्षाचे नेतृत्व कोण करणार याचा निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवावी. यामुळे उदयोन्मुख नेत्यांचा गट तयार करण्यासह पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी विश्वासार्ह पाठिंबा मिळवून देण्यास मदत होणार असल्याचे मत थरूर यांनी व्यक्त केले आहे.
लोकशाहीवादी देशात लोकशाहीवादी पक्ष असणे गरजेचे आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक हे स्वागतार्ह पाऊल आहे. अध्यक्षपदाची निवडणूक अद्याप दूर असून सध्या तरी प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा करणार असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.
पक्षाला पूर्णपणे पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. परंतु काँग्रेस अध्यक्ष पद त्वरित भरले जाण्याची गरज असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.