शहिदांच्या नातेवाईकांचा गौरव : योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त
प्रतिनिधी / बेळगाव
एनसीसी गूप मुख्यालय, 25 कर्नाटक बटालियन एनसीसी बेळगावतर्फे गुरुवारी वेगवेगळय़ा युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या नातेवाईकांचा गौरव करण्यात आला. जाधवनगर येथील एनसीसी परेड मैदानावर हा कार्यक्रम झाला. शहीदों को शत शत नमन या कार्यक्रमांतर्गत शहिदांच्या नातेवाईकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
बेळगाव परिसरातील अनेकांनी देशासाठी प्राण त्याग केला आहे. त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एनसीसी बेळगाव ग्रुपचे अधिकारी कर्नल व्ही. के. जाधव, 25 कर्नाटक बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव साहनी, लेफ्टनंट कर्नल नंदकुमार, कर्नल दर्शन शिव, एअर स्कूलचे ग्रुप कॅप्टन यू. डी. पाटेकर आदी उपस्थित होते.
कर्नल विनायक जाधव यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांबाबत गौरवोद्गार काढले. शिवाय देशवासियांना त्यांचा कायम अभिमान वाटेल, असे सांगितले. यावेळी 60 हून अधिक जवानांच्या नातेवाईकांचा गौरव करण्यात आला. यावेळी जवानांचे नातेवाईक, एनसीसी छात्र यासह तिन्ही बटालियनचे कर्मचारी उपस्थित होते.