दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : पंचक्रोशीतील भक्तांनी घेतला लाभ : मंदिर परिसरात भक्तांची गर्दी
वार्ताहर /किणये
बोकनूर गावातील जागृत शट्टूबाई देवीची यात्रा बुधवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली. यात्रेनिमित्त गावात दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी दिवसभर भक्तांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
बोकनूर गावापासून एक किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य अशा वातावरणात शट्टूबाई देवीचे देवस्थान आहे. या ठिकाणी मंगळवार व बुधवार असे दोन दिवस यात्रा झाली.
मंगळवारी सकाळी गावातील ब्रह्मलिंग मंदिरात समरत्न पूजा करून यात्रोत्सवाला सुरुवात झाली. गावातील सर्व देवतांची पूजा करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता शट्टूबाई देवीच्या मंदिर परिसरात गाऱ्हाणा कार्यक्रम झाला. यावेळी भक्तांची अलोट गर्दी दिसून आली. त्यानंतर रात्री ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. तसेच महाप्रसादाचे आयोजनही केले होते.
गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या संकटामुळे यात्रा अगदी साध्या पद्धतीने करण्यात आली होती. यंदा मात्र कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे मोठ्या थाटात यात्रा झाली. बुधवारी सकाळी पुन्हा शट्टूबाई देवीची विधिवत पूजा करण्यात आली. बुधवारी दिवसभर पश्चिम भागातील अनेक गावांतील भाविक दर्शनासाठी येत होते.
देवस्थान पंच कमिटीच्यावतीने भक्तांची विशेष सोय करण्यात आली होती. यात्रेनिमित्त विविध प्रकारच्या खेळणी, आइक्रीम स्टॉल उभारण्यात आले होते. याचा बालचमू व महिलांनी आनंद लुटला.
बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत मंदिर परिसरात भक्तांची गर्दी दिसून आली. बुधवारी रात्री गावात घरोघरी वैयक्तिक भोजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.