वृत्तसंस्था/ चेन्नई
तीन सामन्यांच्या अनधिकृत वनडे मालिकेत यजमान भारत अ संघाने न्यूझीलंड अ संघावर 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील रविवारी येथे झालेल्या दुसऱया सामन्यात भारत अ ने न्यूझीलंड अ संघाचा 4 गडय़ांनी पराभव केला. भारत अ संघातील फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने शानदार हॅट्ट्रीकसह चार गडी बाद केले.
या दुसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड अ संघाचा डाव 47 षटकात 219 धावात आटोपला. त्यानंतर भारत अ ने 34 षटकात 6 बाद 222 धावा जमवित सामना आणि मालिका विजयावर शिक्कमोतर्ब केला.
न्यूझीलंड अ संघाच्या डावामध्ये रचिन रविंद्र आणि कार्टर यांनी शानदार अर्धशतके झळकविली. कार्टरने 80 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 72 तर रविंद्रने 65 चेंडूत 9 चौकारासह 61 धावा जमविल्या. सोलियाने 49 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 28, बोवेसने 3 चौकारासह 15, रिपॉनने नाबाद 10, ब्रुसने 10 धावा जमविल्या. भारत अ संघातील चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने शानदार हॅट्ट्रीक नोंदवली. न्यूझीलंड अ संघाच्या डावातील 47 व्या षटकात कुलदीप यादवने हा पराक्रम केला. कुलदीप यादवने आपल्या या षटकातील चौथ्या चेंडूवर व्हॅन बेकचा, पाचव्या चेंडूवर वॉकरचा आणि सहाव्या चेंडूवर डफीचा बळी मिळविला. न्यूझीलंड अ संघाच्या डावामध्ये 4 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. कुलदीप यादवने 51 धावात 4, राहुल चहरने 50 धावात 2, ऋषी धवनने 16 धावात 2 तर उमरान मलिक आणि बावा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने 7 कसोटी, 69 वनडे आणि 26 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करताना एकूण 182 गडी बाद केले आहेत. कुलदीप यादवने आपला शेवटचा सामना 2017 साली झिंबाब्वेच्या दौऱयावर खेळला होता. कुलदीपने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये दोनवेळा हॅट्ट्रीक नोंदविली आहे. 2017 साली त्याने कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर त्यानंतर 2019 साली विंडीजविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रीक नोंदविली होती.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत अ संघाने 34 षटकात 6 बाद 222 धावा जमविल्या. सलामीचा पृथ्वी शॉ याने 48 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारासह 77, ऋतुराज गायकवाडने 34 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 30, रजत पाटीदारने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 20, कर्णधार संजू सॅमसनने 35 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह 37, ऋषी धवनने 43 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 22 आणि शार्दुल ठाकुरने 24 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 25 धावा जमविल्या. शॉ आणि गायकवाड यांनी सलामीच्या गडय़ासाठी 82 धावांची भागीदारी केली. गायकवाड बाद झाल्यानंतर शॉने पाटीदारसमवेत दुसऱया गडय़ासाठी 49 धावांची भर घातली. भारत अ च्या डावामध्ये 8 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे व्हॅन बेकने 46 धावात 3, डफीने 76 धावात 2 आणि वॉकरने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड अ 47 षटकात सर्व बाद 219 (कार्टर 72, रचिन रविंद्र 61, सोलिया 28, बोवेस 15, ब्रुस 10, रिपॉन 10, कुलदीप यादव 4-51, चहर 2-50, धवन 2-16, उमरान मलिक 1-35, बावा 1-14). भारत अ 34 षटकात 6 बाद 222 (पृथ्वी शॉ 77, गायकवाड 30, पाटीदार 20, सॅमसन 37, धवन नाबाद 22, ठाकुर नाबाद 25, व्हॅन बेक 3-46, डफी 2-76, वॉकर 1-40).