वृत्तसंस्था/ मुंबई ः
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मायदेशात होणाऱया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सलामीचा फलंदाज शिखर धवनकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. सदर माहिती भारतीय क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणाऱया आयसीसीच्या आठव्या टी-20 विश्वचषक क्रिकेट Rस्पर्धेसाठी काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध मालिकेसाठी शिखर धवन भारताचे नेतृत्व करेल. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघासमवेत व्हीव्हीएस लक्ष्मण प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहण्याची शक्मयता आहे. या मालिकेवेळी नियमित प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड उपलब्ध राहणार नसल्याचे समजते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेला 28 सप्टेंबरपासून प्रारंभ होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना 28 सप्टेंबरला थिरुवनंतपुरम येथे, दुसरा टी-20 सामना गौहत्ती येथे 2 ऑक्टोबरला तर तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 4 ऑक्टोबरला इंदौरमध्ये होणार आहे. टी-20 मालिका संपल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ लखनौला प्रयाण करतील. 6 ऑक्टोबरपासून वनडे मालिकेला प्रारंभ होईल. या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे रांची आणि दिल्ली येथे 9 आणि 11 ऑक्टोबरला खेळविला जाईल.