रोमटामेळ पथके, लोकनृत्ये, वेशभूषा, चित्ररथांनी मने जिंकली, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वार्ताहर /केपे
‘अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान’, ‘गोविदा रे गोपाळा, गोपाळा देवकीनंदन गोपाळा’च्या तालावर आणि ढोल-ताशांच्या गजरात गोव्यातील विविध रोमटामेळ पथकांनी सोमवारी कुडचडे नगरी दुमदुमून टाकली स्थानिकांची मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली. कोविड काळात काही प्रमाणात खंड पडल्यानंतर यंदाच्या शासकीय शिमगोत्सव मिरवणुकीला पूर्वीप्रमाणे पथकांचा व लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वेशभूषा स्पर्धेला दोन्ही गटांत उत्तम प्रतिसाद मिळून दक्षिणेतील ‘कांतारा’ चित्रपटातील नायकाच्या वेशभूषेसह अनेकांचे सादरीकरण हे आकर्षण ठरले. लोकनृत्य स्पर्धेत घोडेमोडणी, गजानृत्य, फुगडी आदींनी लोकांची मने जिंकली. रोमटामेळ पथकांनी तर एकाहून एक सरस सादरीकरण केले. त्यात लहान मुलांपासून युवक, ज्येष्ठ अशा साऱ्यांचा सहभाग दिसला. त्याचबरोबर उत्कृष्ट चित्ररथही सर्वांसाठी आकर्षण ठरले.
यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, नगराध्यक्षा डॉ. जस्मिन ब्रागांझा, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई, उपनगराध्यक्षा रुचा वस्त, नगरसेवक विश्वास सावंत देसाई, प्रसन्ना भेंडे, प्रदीप नाईक, अर्चना प्रभुदेसाई, शेल्डे सरंपच दिप्ती नाईक, असोल्डा सरपंच किस्तोदियो फर्नांडिस, कार्याध्यक्ष अशोक नाईक व इतर मान्यवर हजर होते. कोविडनंतर यंदा भव्य स्वरुपात शिमगोत्सव आयोजित करण्यात यश आले. त्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचा आपण आभारी आहे. रोमटामेळ पथक, चित्ररथ तयार करण्याकरिता अनेक दिवस युवक झटत असतात. त्याकरिता त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे, असे काब्राल म्हणाले. कुडचडे-सावर्डे शिमगोत्सव समितीने अवघ्या काही दिवसांत उत्कृष्ट पद्धतीने आयोजन केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. कुडचडे मतदारसंघातील जनतेने आपल्याला तिसऱ्यांदा निवडून दिलेले असून त्याबद्दल आपण सर्वांचा आभारी आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. शिमगा हा गोव्यातील महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक आहे. यात गोव्याची संस्कृती पाहायला मिळते व या संस्कृतीचे युवावर्गाकडून जतन होताना दिसते. आयोजकांनी कमी वेळेत चांगल्या प्रकारे आयोजन केले, असे नगराध्यक्षा डॉ. ब्रागांझा म्हणाल्या. मंत्री काब्राल यांच्या अध्यक्षतेखाली चांगल्या प्रकारे शिमगोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आपल्या नोकरी व व्यवसायांतून वेळ काढून युवा पिढी शिमगोत्सवात सहभागी झालेली दिसत आहे. ही चांगली गोष्ट आहे, असे जि. पं. सदस्य सिद्धार्थ गावस देसाई यांनी सांगितले.