Tarun Bharat

कोकणात शिंदे गटाला बळ!

Advertisements

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले कोकणातील आमदार दीपक केसरकर आणि उदय सामंत या दोघांचाही राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळातील कोकणच्या वर्चस्वामुळे कोकणात शिंदे गटाला बळ मिळणार आहे. त्यामुळे शिवसेना बॅकफूटवर जाऊ शकते का, हा मुद्दा आहे. मात्र कोकणातील भाजप शिंदे गटाच्या आमदार व कार्यकर्त्यांशी जुळवून घेणार की राणे-केसरकर राजकीय वाद सुरुच राहणार, हे पाहणेही तेवढेच औत्सुक्याचे राहील.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गेला सव्वा महिना मंत्रिमंडळ विस्तार लांबला होता. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता होती. अखेर क्रांतीदिनी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला. शिंदे गटातील सिंधुदुर्गातील आमदार दीपक केसरकर आणि रत्नागिरीतील आमदार उदय सामंत या दोघांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिपदांमुळे शिंदे गटाला कोकणात बळ मिळणार आहे.

20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक झाल्यावर शिवसेनेत बंड झाले आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱया एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा झाल्यावर शिंदे गट सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचला. त्यावेळी सुरुवातीला त्यांच्यासोबत केसरकर आणि सामंत हे दोन्ही आमदार नव्हते. परंतु, केसरकर यांची पहिल्यापासूनच भाजपशी जुळवून घेण्याची स्पष्ट भूमिका होती. त्यामुळे त्यांनीही नंतर गुवाहाटीचा मार्ग स्वीकारला अन् ते शिंदे गटात सहभागी झाले.  शिंदे गटाच्या आमदारांचे प्रवक्तेपदही त्यांना मिळाले. त्यांनी ते कुशाग्रपणे सांभाळलेही. शिंदे गटाची बाजू समर्थपणे प्रसार माध्यमांसमोर ते मांडू लागल्याने त्यांच्यातील एक नवीन पैलू दिसून आला.

विधानसभेत बहुमत परीक्षा पास झाल्यानंतर विरोधकांकडून सरकारच्या अभिनंदनाच्या प्रस्तावात अजित पवार यांनीही केसरकर यांचे नाव आवर्जून घेतले. एकूणच पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बाजू समर्थपणे सांभाळणाऱया केसरकर यांना मंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित होते. परंतु अलीकडील काही दिवसांत त्यांच्या काही वक्तव्यांवरून ते वादातही सापडले होते. त्यामुळे हातातोंडाशी आलेले मंत्रिपद जाऊही शकते, हे लक्षात आल्यावर त्यांनी मवाळ भूमिका घेतली. भाजप नेते नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपांची भाजप नेत्यांनी दखल घेतल्यामुळे राणेंबाबत आपले वैयक्तिक वाद नाहीत. त्यांच्यासोबत काम करायला तयार असल्याचे म्हणत ते बॅकफूटवर गेले. त्यांनी या वादात एक पाऊल मागे घेतले. त्याचाच फायदा होऊन महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान न मिळू शकलेल्या केसरकर यांना शिंदे गटातून मंत्रिपद मिळाले.

शिंदे गटाच्या बंडानंतर सिंधुदुर्ग जिल्हय़ातील शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते हे शिवसेनेसोबतच राहिले. खासदार विनायक राऊतही शिवसेनेसोबतच राहिले. केसरकर यांच्यासोबत काही ठराविक शिवसेना पदाधिकारी राहिले. त्यामुळे सिंधुदुर्गात शिंदे गटाचे अस्तित्वच नाही, अशी टीकाही भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांने केले होती. परंतु असे असले, तरी काही पदाधिकारी, कार्यकर्ते सत्तेच्या बाजूने झुकणारे असतात. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि त्यात केसरकर यांना मंत्रिपद मिळणार का, याकडे ते लक्ष ठेवून होते. अशा प्रकारचे कुंपणावर असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते केसरकर यांच्यासोबत येऊ शकतात आणि शिंदे गटाला बळ मिळू शकते.

शिंदे यांनी केलेल्या बंडातील आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचल्यानंतरही सुरुवातीला केसरकरांप्रमाणे उदय सामंतही शिंदे गटात नव्हते. मात्र सामंत यांनी शहाणपणा करीत मागाहून गुवाहाटीची वाट धरली आणि ते शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे मंत्रिपदाचा अनुभव असलेल्या व अभ्यासूपणा असलेल्या उदय सामंत यांचाही मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झाला आणि सिंधुदुर्ग व रत्नागिरी या कोकणातील दोन्ही जिल्हय़ांना शिंदे गटाच्या कोटय़ातून मंत्रीपद मिळाले.

मागील अडीच वर्षे उदय सामंत यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद उत्तम प्रकारे सांभाळले होते. आता ते पुन्हा मंत्री झाल्याने रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्गातीलही त्यांच्या समर्थकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. उदय सामंत यांचा रत्नागिरीमध्ये चांगला प्रभाव असल्याने रत्नागिरी जिल्हय़ात शिंदे गटाचे बळ वाढणार आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांना लोकसभा निवडणुकीत रत्नागिरीतून मताधिक्य मिळवून देण्यात सामंत यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या पाठिशी कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे आणि आता मंत्रिपद मिळाल्याने शिंदे गटाला अधिक बळ मिळणार आहे.

मूळचे कोकणातील असलेले व डोंबिवलीमधून निवडून येणारे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोकणचे वर्चस्व दिसून आले आहे.

आता खाते वाटपानंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीचे पालकमंत्री पद कुणाला मिळणार, यावर भविष्यातील शिंदे गट व भाजपचे संबंध कसे राहणार, हे ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात आजपर्यंत भाजपचा पालकमंत्री कधीच झाला नाही. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना पालकमंत्रिपद दिले जाईल का, याबाबत चर्चा सुरू आहे. तर तिसऱया टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात नीतेश राणेंची वर्णी लागू शकते, असेही म्हटले जाते.

सद्यस्थितीत केसरकर हेच पालकमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. रत्नागिरीत उदय सामंत हेच पालकमंत्री होतील, हे निश्चित आहे. केसरकर पालकमंत्री झाल्यानंतर मात्र राणे कुटुंबीय व केसरकर यांच्यातील राजकीय वैर संपणार की, सत्तेत एकत्र असले, तरी राणे-केसरकर वाद सुरुच राहणार हे पाहावे लागेल. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात कोकणचे वर्चस्व दिसून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

संदीप गावडे

Related Stories

बिहारी सर्कस!

Patil_p

पर्वत आणि वृक्ष यांची महती

Patil_p

रेशीमकाठी वादविवाद !

Patil_p

कारजॅकिंग ः कार चोरीची डिजिटल पध्दत

Patil_p

स्यमंतक मणीच्या प्रसादलाभें

Patil_p

बीपीसीएल चार्जिंग केंद्रांसाठी गुंतवणार 200 कोटी

Patil_p
error: Content is protected !!