बुलढाणा, पुणे / प्रतिनिधी :
बुलढाणा बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदेगटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. या धुमश्चक्रीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बुलढाण्यातही सध्या सेना व शिंदेसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, शिवसेनेचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाल्यामुळे हल्ला करणाऱ्या शिंदेगटातील सैनिकांनी पोबारा केला.
विशेष म्हणजे, पोलिसांसमोरच हा हल्ला झाला. खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यांमध्ये आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप केला. याबाबत अनेक चित्रफिती उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. सुमारे 15 मिनिटे चाललेल्या या राडय़ात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
अधिक वाचा : धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा शेतकऱ्यांकडून निषेध; काळे झेंडे दाखवत ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा
शेतकऱ्यांची संस्था असलेल्या बाजार समितीत एकतर राजकीय कार्यक्रम घेतला आणि त्यात आमच्या नेत्यांबद्दल गलिच्छ भाषा वापरली. आजची घटना म्हणजे त्याची संतप्त प्रतिक्रिया आहे. आमचे कार्यकर्ते आग्यामोहोळ आहेत. यापुढे आमच्या नेत्यांबद्धल गलिच्छ विधाने केल्यास जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला.