वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथे सुरू असलेल्या इंडियन ग्रां प्रि 3 ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरूषांच्या तिहेरी उडीमध्ये अब्दुल्ला अबुबाकर आणि कार्तिक उन्नीकृष्णन यांनी चमकदार कामगिरी करत 17 मी.चा टप्पा पार केला. या क्रीडाप्रकारात अबुबाकरने पहिले तर उन्नीकृष्णनने दुसरे स्थान मिळविले.
पुरूषांच्या तिहेरी उडीत 26 वर्षीय अब्दुल्ला अबुबाकरने 17.19 मी.चे अंतर नोंदवीत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडाप्रकारात भारतीय हवाईदलाच्या 28 वर्षीय उन्नीकृष्णनने 17.10 मी.चे आंतर नोंदवित दुसऱया स्थानासह रौप्य आणि केरळच्या पॉलने कांस्यपदक मिळविले. पुरूषांच्या तिहेरी उडी या क्रीडाप्रकारात 2016 साली रेंजीत माहेश्वरीने 17.30 मी.चा राष्ट्रीय विक्रम बेंगळूरमध्ये झालेल्या स्पर्धेत केला होता. त्यानंतर गौहत्तीमध्ये 2018 साली अर्पिंदर सिंगने या क्रीडाप्रकारात 17.09 मी. चे अंतर नोंदविले होते.
भुवनेश्वरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत ओडिशाच्या 31 वर्षीय सरबानी नंदाने महिलांच्या 200 मी. धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक तसेच उत्तरप्रदेशच्या सरिता रोमीत सिंगने महिलांच्या हातोडाफेकमध्ये सुवर्णपदक पटकाविले. पुरूषांच्या 200 मी. धावण्यांच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या अक्षय शेट्टीने 21.86 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. ओडिशाच्या आर्यन एक्काने रौप्यपदक मिळविले. तामिळनाडूच्या दिनदयालनने पुरूषांच्या पोल व्हॉल्टमध्ये सुवर्णपदक मिळविताना 4.60 मी.चे अंतर नोंदविले.