जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा जगासमोर न आणता त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सरकारी खर्चावर अधिक चर्चा करण्यावर पाश्चिमात्य प्रसार माध्यमांनी डंका पिटण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्याच्या हत्याकांडाचे उघड झालेले रहस्य जगापासून लपविण्यात येत आहे. शिंजो आबेच्या मारेकऱयाने दिलेल्या माहितीनुसार या हत्याकांडाला जपानमध्ये जोमाने फैलावणारी युनिफिकेशन चर्च जबाबदार असल्याचे उघड झाले आहे.
भारतात नुकताच पितृ पंधरवडा साजरा करण्यात आला. आपल्या मृत पावलेल्या नातेवाईकांची आठवण करून त्यांना समारंभपूर्वच जेवण अर्पण करण्याची प्रथा परंपरा अजून सुरु आहे. हिंदू धर्मातील या चालीरीतींना अंधश्रध्देचे वलय लावणाऱया चर्च संस्थांचे जपानमधील अंग याच कार्यासाठी प्रसिद्ध आहे. युनिफिकेशन चर्च नावाच्या या संस्थेने जपानमधील अतिप्रगत अशा नागरिकांना त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त करून देण्याचे आमिष दाखवून अक्षरशः लुबाडून सोडलेले आहे. अशाच लुबाडणुकीचा फटका बसलेल्या तेत्सुया यामागामी या युवकाने युनिफिकेशन चर्चला राजाश्रय देत असलेल्या पक्षाच्या नेत्याला आपल्या गोळीबाराने लक्ष्य बनविले.
तेत्सुया यामागामी नावाचा 41 वर्षीय तरुण एका प्रतिष्ठित सुखवस्तू घराण्यात जन्माला आला. आई-वडिलांचा बांधकाम व्यवसाय होता. पुढे काही वर्षांनी तेत्सुयाने आपल्या वडिलांना गमावले. आईकडील आजोबांनी बांधकाम व्यवसाय कायम ठेवला. पण त्याचे देहावसान झाल्यानंतर तेत्सुयाच्या आईने व्यवसायात लक्ष घातले. पण आपले पती आणि वडिल गमावलेल्या या तीन मुलांच्या आईला युनिफिकेशन चर्चच्या मार्केटिंग अधिकाऱयाने गाठून त्यांचे पती आणि वडिलांचे आत्मे अस्वस्थपणे भटकत असल्याचे सांगून वश करून घेतले. इथेच यामागामी यांच्या कुटुंबाच्या दैवाचे फेरे सुरु झाले. युनिफिकेशनच्या या मायाजालात अडकलेल्या तेत्सुयाच्या आईने आपल्याला वडिलाकडून मिळालेला भूखंड आणि सहा कोटी रुपये या चर्चला दान केले. यामुळे यामागामी कुटुंब उघडय़ावर आले. 1992 ते 2002 या काळात यामागामी कुटुंबाची वाताहात करून सोडली. तेत्सुयाचा मोठा भाऊ औषधाविना कर्करोगाने मरण पावला. तेत्सुया घरच्या परिस्थितीमुळे आपले शिक्षण पूर्ण करू शकला नाही. पुढे त्याने आपल्या चरितार्थासाठी चार वर्षांच्या काळासाठी जपानच्या नौदलात खलाशाची नोकरी पत्करली.
नौदलाच्या सेवेतून मुक्त झाल्यानंतर तेत्सुया यामागामीने ज्यांच्या प्रभावाने त्याच्या आईने सर्वस्वाचे दान केले, ते नक्की काय आहे याचा शोध घेतला. या शोध मोहिमेत त्याला जपानमधील युनिफिकेशन चर्च त्यांच्या कुटुंबाच्या अंधपतनाला कारणीभूत असल्याची जाणीव झाली. मात्र सध्या या चर्चला देशातील बडय़ा राजकीय पक्षांनी राजाश्रय दिल्याने चर्च सदस्यांनी राजरोसपणे आपला लुबाडणुकीचा धंदा सुरु ठेवल्याचे दिसून आले. यात शिंजो आबे यांचा पक्ष चर्चला अधिकच जवळ धरून बसल्याचे त्याच्या लक्षात आले. तसेच शिंजो आबे यांचे घराणे या चर्चच्या संपर्कात असल्याचे लक्षात घेऊन तेत्सुया यामागामीने त्यांना व जपान सरकारला धडा शिकविण्यासाठी हत्याकांडाचे कठोर पाऊल उचलले.
युनिफिकेशन चर्च ही ख्रिश्चन धर्मियांची संस्था जपानमध्ये प्रभावशाली ठरलेली आहे. या संस्थेने आपल्या भक्तांची प्रचंड प्रमाणात लुबाडणूक केली असून असंख्य कुटुंबाची यात वाताहात झालेली आहे. दुसरीकडे शिंजो व बौद्धबहुल जपानमधील राजकीय नेत्यांशी या संस्थेचे वरपर्यंत संबंध आहेत. त्यामुळे या युनिफिकेशन चर्चमुळे वाताहत झालेल्या एका कुटुंबातील तेत्सुया यामागामी नामक व्यक्तीने सूडापायी शिंजो आबे यांच्यावर गोळीबार केल्याचे आता समोर आल्याने खळबळ उडाली असून त्यातून युनिफिकेशन चर्चचा खरा चेहरा जगासमोर उघड झालेला आहे. या चर्चपाशी असलेल्या एकूण संपत्तीचा 70 टक्के वाटा जपानमधून येतो.
युनिफिकेशन चर्च हे ख्रिश्चन धर्मातील एक पंथ आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व संस्था याचे नाव आहे. सन म्यूंग मून या दक्षिण कोरियातील व्यक्तिने 1 मे 1954 रोजी स्थापन केलेल्या होली स्पिरिट असोसिएशन फॉर द युनिफिकेशन ऑफ वर्ल्ड ख्रिश्चानिटी या संस्थेपासून या पंथाची सुरुवात झाली. ही संस्था रोजच्या व्यवहारात युनिफिकेशन चर्च या नावाने ओळखली जाते. संस्थापक मून याचा जन्म 1920 साली झाला. त्यावेळी दक्षिण कोरिया जपानच्या अधिपत्याखाली होता. मूनच्या कुटुंबाने ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता. पुढे दुसऱया महायुद्धाच्या समाप्तीनंतर दक्षिण कोरिया स्वतंत्र झाल्यानंतर मून याने आपल्या
ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला सुरुवात केली. या पंथाच्या अनुयायांच्या म्हणण्याप्रमाणे 1936 साली येशू ख्रिस्ताने ईस्टर संडेच्या दिवशी मून याला साक्षात्कार देऊन आपले अपुरे कार्य पूर्ण करण्यास सांगितले. या पंथाचा सर्वात महत्त्वाचा संस्कार म्हणजे जोडप्यांना आशीर्वाद देणे आणि त्यांना दूषित रक्तापासून मुक्त करून परमेश्वराच्या परंपरेत जोडणे.
तसेच दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये जपानचे राज्य असताना ज्यांनी या दोन्ही देशांत अत्याचार केले, अशा मृतांची माहिती काढून त्यांच्या जपानमधील वारसांना शोधून त्यांना त्यांच्या मृतात्म्याने आमच्याशी संपर्क करून सद्गती मिळवून देण्याची केलेली मागणी सांगितली जाते. त्यांच्या प्रिय व्यक्तिला सद्गती मिळवून देण्यासाठी चर्चला देणगी देण्याची मागणी केली जाते. अशी एखादी व्यक्ती त्यांच्या कचाटय़ात सापडली की त्यांच्याकडून अधिकाधिक पैसे उकळून त्या कुटुंबाला रस्त्यावर आणले जाते. यामागामीच्या आईवरही हाच प्रयोग केल्याने त्याच्या मनात सूडाची भावना पेटून उठली होती.
युनिफिकेशन चर्चच्या प्रभावापायी त्याच्या कुटुंबाची झालेली वाताहत यामागामी विसरु शकत नव्हता. त्याने याचा सूड घेण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने चर्चचे दिवंगत संस्थापक मून यांचा कारभार सांभाळणाऱया त्याच्या पत्नी हाक जा हानची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या अभेद्य सुरक्षेपुढे ते शक्य झाले नाही. पुढे यामागामीने या पंथाची सखोल माहिती काढली असता या पंथाच्या जपानमधील प्रभावाला लिबरल डेमोक्रेटिक पार्टी आणि त्याचे नेते शिंजो आबे जबाबदार आहेत, हे लक्षात आले. आबे यांची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ होती. या संधीचा फायदा उठवत नारा येथे निवडणूक प्रचार सभेत भाषण करताना 8 जुलै रोजी पाठीमागून गोळय़ा झाडून यामागामीने आबे यांची हत्या करून एक प्रकारे सूड उगवला.
प्रशांत कामत