Tarun Bharat

शिंजो आबेंवर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार

पंतप्रधान मोदी यांच्यासह 700 जागतिक नेत्यांची उपस्थिती

@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर राजकीय इतमामात (स्टेट फ्यूनरल) टोकियो येथील निप्पॉन बुडोकन कम्युनिटी सेंटरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 700 हून अधिक जागतिक नेत्यांनी आबे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. स्टेट फ्यूनरलदरम्यान आबे यांच्या सन्मानार्थ 19 तोफांची सलामी देण्यात आली. तसेच आबे यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटांचे मौन राखण्यात आले.

शिंजो आबे यांची 8 जुलै रोजी गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कौटुंबिक स्तरावर शिंजो यांच्यावर 15 जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याचमुळे मंगळवारी झालेले स्टेट फ्युनरल केवळ प्रतिकात्मक होते. या फ्यूनरलला काही लोकांचा विरोध देखील झाला आहे. निप्पॉन बुडोकनबाहेर लोकांनी निदर्शने केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिंजो आबे यांना फ्लोरल ट्रिब्यूट दिले.

राजघराण्याकडून श्रद्धांजली

स्टेट फ्यूनरल कार्यक्रमात जपानचे राजघराणे देखील उपस्थित राहिले. जपानच्या परंपरेनुसार किंग नारुहितो, राणी मासाको, राजे एमेरिटस अकिहितो आणि राणी एमेरिटा मिचिका यांनी या कार्यक्रमात भाग घेतला नाही. यामुळे युवराज अकिशिनो, त्यांच्या पत्नी युवराज्ञी किको आणि राजघराण्याच्या अन्य सदस्यांनी आबे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आबे यांच्या पत्नीने आणला अस्थिकलश

भारतीय प्रमाणवेळेनुसार स्टेट फ्युनरलचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी 10.30 वाजता सुरू झाला आणि तो सुमारे दीड तास चालला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिंजो आबे यांच्या पत्नी अकी आबे अस्थिकलशासह पोहोचल्या. यावेळी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस, सिंगापूरचे पंतप्रधान सीन लूंग, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज, व्हिएतनामचे अध्यक्ष गुयेन जुआन फुक, दक्षिण कोरियाचे पंतप्रधान हान डक-सू, फिलिपाईन्सच्या उपाध्यक्ष सारा दुतेर्ते-कार्पियो, इंडोनशियाचे राष्ट्रपती मारुफ अमीन, युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्यासह 700 प्रतिनिधींनी आबे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

मोदी-किशिदा यांच्यात चर्चा

पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान किशिदा यांच्यासोबत सार्थक बैठक झाली. आम्ही विविध द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा केली आहे. माजी पंतप्रधान आबे यांच्या दुःखद निधनावर शोक व्यक्त केल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विट करत सांगितले आहे. भारत आणि जपानच्या मैत्रीने एक जागतिक प्रभाव निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. पुढील काळात दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास असल्याचे मोदींनी किशिदा यांच्याशी चर्चेदरम्यान म्हटले आहे.

Related Stories

गूढ गुहेत वटवाघुळाने वैज्ञानिकांचा घेतला होता चावा

Patil_p

शाहबाज अन् इस्रायलच्या अधिकाऱयांची भेट

Patil_p

तालिबानकडून सरकार स्थापनेची घोषणा

datta jadhav

इटलीच्या पंतप्रधानांचे उपाय

Patil_p

दर शुक्रवारी वधूसारखी नटणारी महिला

Patil_p

तालिबानची अमेरिकेला धमकी

datta jadhav