कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला १०० फुट लांबीचा व ६८ फुट रुंदी असलेला भव्य तिरंगा ध्वज
शिराळा/वार्ताहर
संपूर्ण देशच भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हर्ष उल्हासात साजरे करीत असताना प्रत्येक नागरीक, संस्था आपापल्या परीने उपक्रम राबवून भारतमातेच्या प्रती प्रेमाची, निष्ठेची व देशाप्रती अभिमानाची जाज्वल्य भावना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना भारत देशाप्रती आपली निष्ठा व आस्था प्रदर्शित करीत भव्यदिव्य राष्ट्रध्वज फडकवण्याचा राज्यातील पहिलाच उपक्रम सांगली जिल्ह्यातील शिराळा नगरपंचायतीने राबविला.
या उपक्रमांच्या सुरुवातीला शहरातील न्यू इंग्लिश स्कुल, कन्या शाळा शिराळा, श्री शिव छत्रपती विद्यालय, विश्वासराव नाईक व बाबा नाईक महाविद्यालय, भारतीय विद्यानिकेतन, यशवंत बालक मंदिर, सदगुरु प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, उर्दु शाळा , जिल्हा परिषद शाळा, शिराळा तसेच शहरातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सहभागाने शहरातील प्रमुख मार्गावरुन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची जनजागृती करत सुमारे ३००० हजार विद्यार्थ्यांच्या घोषणांच्या गजरात जगजागृती रॅलीची सुरुवात झाली. तर या रॅलीचा समारोप श्री शिव छत्रपती विद्यालय मैदानात करण्यात आला.
या मैदानावर उपस्थितांना तहसिलदार गणेश शिंदे यांनी घरोघरी तिरंगा अभियानाबाबत संबोधित केले. यानंतर या कार्यक्रमाचा प्रमुख गाभा असलेला व कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या १०० फुट लांबीचा व ६८ फुट रुंदी असलेला भव्य तिरंगा ध्वज विद्यार्थ्यांच्या शिरावरून देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाची आठवण करुन देणा-या रिमझिम पावसात डौलात व तेवढ्याच अभिमानात फडकविण्यात आला. या फडकलेल्या राष्ट्रध्वजाला उपस्थित सर्वांनीच राष्ट्रगीताच्या गजरात सलामी देवून मानवंदना दिली.
यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, शिराळा नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार कोकरुड पोलीस ठाण्याचे,श सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, गटशिक्षण अधिकारी प्रदिप कुडाळकर तसेच शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थींनी यांच्या उपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडला.
उपस्थित सर्वांनी शिराळा नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या धैर्य व धाडसाने अभुतपूर्व यशस्वीपणे राबविलेल्या या दैदिप्यमान नेत्रदिपक सोहळ्याचे उपस्थित सर्वांनीच कौतुक केले.