सिद्धेश्वर मंदिरामध्ये मानाच्या नारळाला विक्रमी किंमत : शिरगांवकरांनी जपली आहे अनोखी परंपरा…. !
प्रतिनिधी/ वाळवा (शरद माने)
अबबब…एका नारळाची किंमत १ लाख २५ हजार १५१ रुपये … ! कोथिंबीर पेंडीचा दर ८ हजार ५०० रूपये ? गव्हाचा दर ९ हजार ५०० रुपये ? तांदळाचा दर ९ हजार रुपये ? हरभरा डाळीचा दर ७ हजार ९०० रुपये ? चटणीचा दर ८ हजार ३०० रुपये ? हे दर वाचून आणि ऐकून तुम्हाला वाटेल महागाई किती वाढली आहे ? परंतु घाबरू नका… हे दर आहेत वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील सिद्धेश्वर मंदिरामध्ये मानाच्या वस्तू आणि पदार्थांचे. शिरगाव ता. वाळवा येथील सिद्धेश्वर मंदिरातील सोहळ्यामध्ये पारायण व नाम सप्ताहामध्ये पुजलेल्या साहित्याची बोली किंवा लिलाव म्हणा लावला जातो. यावेळी लिलावात खरेदी केल्या वस्तूंचे हे दर आहेत. विशेष म्हणजे या लिलावात मानाच्या नारळाला विक्रमी किंमत मिळाली. मानाच्या नारळाचा लिलाव झाला. यावेळी तो मानाचा नारळ अरविंद बाजीराव पवार यांनी १ लाख २५ हजार १५१ रुपयांना खरेदी केला.
दरम्यान, पारायणामध्ये वापरून शिल्लक राहिलेले साहित्य आपल्या घरी नेले तर आपल्या घरी सुख, समाधान, समृद्धी येते व देवाचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. ही शिरगावकरांची श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी मंदिरांमध्ये सर्व गावकरी एकत्र जमतात आणि शिल्लक राहिलेल्या वस्तूंचा लिलाव शेवटच्या दिवशी लावला जातो. आपापल्या ऐपतीनुसार आपल्या घराकडे वस्तू कशी नेता येईल ? यासाठी गावकऱ्यांची चढाओढ असते. नारळ खरेदी करण्यासाठी मोठीच गर्दी व चढाओढ चा वस्तूअसते. यंदा मानाचा नारळ खरेदी करण्याचा मान अरविंद बाजीराव पवार यांना मिळाला.
गेल्या ९४ वर्षांपासून शिरगावने ही परंपरा जपली आहे. मानाचा नारळ अरविंद बाजीराव पवार यांनी १ लाख २५ हजार १५१ रुपयांना खरेदी केला. आजपर्यंतच्या पारायणाच्या लिलावामध्ये नारळाच्या लिलावात मानाचा नारळाची १ लाख २५ हजार १५१ रुपये ही विक्रमी किंमत आहे.
या सर्व वस्तूंचा लिलाव केल्यानंतर जमणारा सर्व निधी सिद्धेश्वर सेवा ट्रस्टसाठी जमा केला जातो व यातून मंदिराचा विकास व विविध उपक्रम राबवले जातात. असा आदर्श उपक्रम सांगली जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.