पुलाची शिरोली/ वार्ताहर
शिरोली येथील आर्यन बुडकर आत्महत्या प्रकरणी सिम्बाॅलीक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष गणपत पाटील यांना शिरोली पोलीसांनी शुक्रवारी अटक करुन पेठवडगाव न्यायालयात हजर केले. न्यायालयाने श्री. पाटील यांना एक दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
आर्यनच्या मृत्यूस सिम्बाॅलीक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष गणपत पाटील व प्राचार्या गिता पाटील हेच जबाबदार असल्याची तक्रार आर्यनचे आजोबा रामचंद्र बुडकर यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यामुळे गणपत पाटील व गिता पाटील हे दाम्पत्य फरारी झाले होते. त्यानंतर पाटील दांपत्याने अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला होता. तेथे दोघांचाही जामीन नामंजूर करण्यात आला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दोघांनी दोन स्वतंत्र अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले. यामध्ये गीता पाटील यांना जामीन मिळाला. मात्र गणपत पाटील याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयानेही नामंजूर केला. दरम्यान लोकभावनेचा उद्रेक होऊ लागल्याने पोलीसांनी तात्काळ त्यांना अटक करावी अशी मागणी पोलिस प्रशासनावर दबाव वाढवत होती. शाळा बंद करा, संबंधितांना अटक झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, यासाठी मोर्चा, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन अशा विविध घटनांनी पोलिस प्रशासनाला वेठीस धरले होते. अखेर स्कूलचे अध्यक्ष गणपत पाटील यांना अटक करून पोलिसांनी समाज भावनेचा सन्मान राखला असल्याची ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील हे तपास करत आहे.