‘एक कुटुंब, एक तिकीट’चे धोरण
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाब विधानसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यावर शिरोमणी अकाली दलाने आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी नवी योजना तयार केली आहे. या योजनेच्या अंतर्गत शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी तरुणाई, महिलांसह समाजातील अन्य घटनांना पक्षात अधिक स्थान देण्याच्या उद्देशाने अनेक महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा केली आहे. पक्ष आता ‘एक कुटुंब, एक तिकीट’ धोरण अंमलात आणणार आहे.
पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवून नव्या पिढीच्या नेत्यांना विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.
पक्षात निर्णय घेणाऱया सर्वोच्चस्तरीय कोअर कमिटीत देखील बदल केले जाणार आहेत. नव्या संघटनात्मक आराखडय़ाची निवडणूक 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. राज्याच्या सर्व विधानसभा मतदारसंघांकरता 117 पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाईल. बूथ समित्यांच्या स्थापनेवर लक्ष देण्यात येणार असल्याचे बादल यांनी म्हटले आहे.
शीख छात्र संघाला (विद्यार्थी संघटना) पुनरुज्जीवीत करण्यात येणार आहे. युथ अकाली दल आणि स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे पुनर्रचना करण्यात येणार आहे. युथ अकाली दलाच्या सदस्यत्वासाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असेल आणि अध्यक्षाला या वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात येणार असल्याची माहिती सुखबीर यांनी दिली आहे.